ठाणे -शिवसेनेकडे असलेल्या अंबरनाथ विधानसभा मतदारसंघावर भाजपने दावा करण्यास सुरुवात केली आहे. जागांच्या अदलाबदलीमध्ये शिवसेनेने ही जागा भाजपला द्यावी, अशी मागणी भाजपच्या स्थानिक पदाधिकाऱ्यांनी केली आहे. तर शिवसेनेच्या स्थानिक नेत्यांनी भाजपच्या मागणीला विरोध केल्याचे पाहायला मिळत आहे.
हेही वाचा... विधानसभा 2019 : काँग्रेस-राष्ट्रवादीचं ठरलं; प्रत्येकी 125 जागा लढवणार
अंबरनाथ विधानसभा मतदारसंघात शिवसेनेचे बालाजी किणीकर हे विद्यमान आमदार आहेत. सन २००९ मध्ये मतदारसंघ पुनर्रचनेनंतर अंबरनाथ विधानसभा मतदारसंघ अनुसूचित जातीसाठी राखीव झाला. तसेच बदलापूर व लगतचा काही भाग वगळून उल्हासनगरचा काही भाग या मतदारसंघात जोडण्यात आला. या निवडणुकीत शिवसेनेने डॉ. बालाजी किणीकर यांना उमेदवारी दिली. या निवडणुकीत स्थानिक उमेदवार हा मुद्दा प्रभावी ठरल्याने बालाजी किणीकर यांना सहजपणे विजय मिळवणे शक्य झाले. त्यानंतर झालेल्या २०१४ च्या निवडणुकीत शिवसेना-भाजपची युती न झाल्याने भाजपनेही उल्हासनगर महानगरपालिकेतील नगरसेवक राजेश वानखेडे यांना मैदानात उतरवले. या निवडणुकीत बालाजी किणीकर विजयी झाले आणि वानखेडे यांचा अवघ्या २०४१ मतांनी पराभव झाला. त्यामुळे स्वाभाविकच यंदाच्या विधानसभा निवडणुकीसाठी भाजपाच्या आशा पल्लवित झाल्या असून, अंबरनाथ विधानसभेच्या उमेदवारीसाठी इच्छुकांची रस्सीखेच सुरू झाली आहे. त्यातूनच आता भाजपा शिवसेनेच्या अंबरनाथ मतदारसंघावर दावा करू लागली आहे.
हेही वाचा...नेवासा विधानसभा मतदारसंघ: तिरंगी लढतीत कोण मारणार बाजी?
अलीकडेच अंबरनाथमध्ये शहराध्यक्ष भरत फुलोरे यांनी आयोजित केलेल्या भाजपच्या कोअर कमिटीच्या बैठकीत अंबरनाथ विधानसभेची जागा भाजपाला मिळावी, अशी मागणी करण्यात आली आहे. भरत फुलोरे यांच्यासह ठाणे विभागीय उपाध्यक्ष किसन तारमळे, कृष्णा रसाळ-पाटील, पूर्णिमा कबरे, तुळशीराम चौधरी, सलीम चौधरी, संतोष शिंदे या कोअर कमिटी सदस्यांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीतील या निर्णयाची माहिती पत्रकार परिषदेत देण्यात आली.