ठाणे -कोरोनाच्या काळात तरी अशाप्रकारे पेट्रोल दरवाढ किंवा कोणत्याच वस्तूंची भाववाढ करू नये, अशी विनंती सरकारला करत आहेत ठाण्यातील एका गृहिणी. कारण आहे आज पेट्रोलच्या किंमतीने शंभरी गाठली आहे. त्यामुळे वाहन चालवावे की नाही, असा प्रश्नच ठाणेकरांना पडला आहे.
आर्थिक फटका
एकीकडे कोरोनाच्या लॉकडाऊनमध्ये अनेकांच्या नोकऱ्या गेल्या आहेत. तर अनेकांचे उद्योगधंदे ठप्प झाले आहेत. त्यामुळे आर्थिक फटका सर्वसामान्य नागरिकांना बसत आहे. त्यातच आता पेट्रोलचा भाव शंभर रुपये झाला आहे. त्यामुळे नागरिकांमध्ये नाराजीचा सूर आहे.
'कोणतेही भाव वाढवू नयेत'
पेट्रोलचा भाव वाढला की सर्वच वस्तूंचे भाव वाढतात, त्यामुळे सरकारने या गोष्टींकडे गांभीर्याने पाहावे, त्याचबरोबर महाराष्ट्रातच का पेट्रोलचे भाव वाढलेले आहेत, याचाही विचार करावा, तर या कोरोनाच्या काळात तर कोणतेही भाव वाढवू नयेत, अशी विनंती आम्ही सरकारला करतोय, अशी प्रतिक्रिया ठाणेकरांनी दिली आहे. ठाण्यात पेट्रोलचा भाव 99 रुपये 98 पैसे आहे. त्यामुळे 100पार करण्यासाठी आणखी काही वेळ लागणार असला तरीही नागरिकांमध्ये या दरवाढीमुळे मोठा रोष निर्माण झाला आहे.