ठाणे - शहापूर तालुक्यातील खर्डी-टेंभा-वाडा रस्त्यावर दहिगाव गावाजवळ रस्त्याला तडा गेला असून संपूर्ण रस्ता एका बाजूला खचला आहे. तर याच रस्त्यावर 'बेलवड' गावाजनिक असलेला पूल अतिवृष्टीमूळे वाहून गेला आहे. यामुळे शहापूर व वाडा तालुक्याचा संपर्क तुटला आहे. विशेष म्हणजे हा रस्ता मुंबई-अहमदाबाद महामार्गाला जोडणारा हा प्रमुख रस्ता आहे.
वाहतूक ठप्प; चाकरमान्यांना फटका
पूल वाहून गेलेल्या खर्डी-टेंभा-बेलवड, या रस्त्याची मालकी मुंबई महानगरपालिकेकडे आहे. यामुळे या मार्गाने वाडा तालुक्यातून खर्डी रेल्वे स्थानकावर येणारे चाकरमानी, दूध व्यवसायिक, तसेच नाशिकवरून वाडा, मनोर, पालघरकडे होणारी भाजीपाला वाहतूक, वाडा येथील औद्योगिक वसाहतीकडे जाणारी जड वाहनांची वाहतूक, एस. टी. महामंडळाच्या बसेस या संपूर्ण वाहतुकीवर परिणाम झाला आहे.