ठाणे -२०१४ साली वाशी टोल नाका येथे मनसेच्या कार्यकत्यांनी खळ्खट्याक आंदोलन केल्या प्रकरणी मनसे प्रमुख राज ठाकरे यांना जामीन मंजूर करण्यात आला आहे. न्यायालयाने राज ठाकरे यांना कोणत्याही अटी आणि शर्तीवीना जामीन मंजूर केला आहे. तसेच या प्रकरणाची पुढील सुनावणी ५ मे रोजी होणार असून पुढच्या सुनावणीला अनुपस्थित राहण्याची परवानगी न्यायालयाने दिली आहे. यावेळी राज ठाकरेंसोबत अमित ठाकरे, बाळा नांदगावकर, गजानन काळेही उपस्थित होते.
राज ठाकरे न्यायालयात दाखल राज ठाकरे स्वत: न्यायालयात होते हजर
वाशी पोलीस ठाण्यात राज ठाकरेंविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्यांना अनेकदा न्यायालयाकडून समन्स बजावण्यात आला होता. मात्र, राज ठाकरे उपस्थित न राहिल्याने अखेर बेलापूर न्यायालयाने त्यांच्या विरोधात अटक वॉरंट काढले होते. त्यामुळे आज राज ठाकरे स्वत: न्यायालयात हजर झाले होते. सुनावणी दरम्यान, राज ठाकरे यांना न्यायलयाने 15 हजारांच्या जातमुचलक्यावर त्यांना जामीन मंजूर केला आहे. आता याप्रकरणाची पुढील सुनावणी 5 मे रोजी होणार आहे. तसेच यापुढे राज ठाकरे यांना सुनावणीसाठी यावं लागणार नाही, असे राज ठाकरे यांच्या वकीलांनी सांगितले.
राज ठाकरे यांच्या वकीलांची प्रतिक्रिया राज ठाकरे यांच्यावर जामीनपात्र गुन्ह्याची नोंद -
वाशी टोल नाका तोडफोड प्रकरणी राज ठाकरे यांना बेलापूर कोर्टाने समन्स बजावले असून आज राज यांना कोर्टात हजर राहण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार राज यांच्यावर जामीनपात्रच गुन्हे नोंद असल्याचे राज यांच्या वकिलांचे म्हणणे आहे.
निवडणूकांसाठी नाही, तर साहेबांच्या प्रेमापोटी कार्यकर्ते जमले -
अनेक वेळा समन्स पाठवूनही राज ठाकरे उपस्थित न राहिल्याने बेलापूर कोर्टाने त्यांच्या विरोधात वॉरंट काढले होते. त्यामुळे आज राज ठाकरे स्वत: कोर्टात हजर राहणार होते. यासाठी मनसेने जोरदार तयारी सुरू केली होती. राज ठाकरे यांच्या स्वागतासाठी शहरात बॅनरबाजी करण्यात आली होती. चार ते पाच हजार कार्यकर्ते यावेळी कोर्टाच्या आवारात उपस्थित होते. नवी मुंबई महानगर पालिका निवडणूक येत्या एप्रिल महिन्यात होणार असल्याने मनसेला वातावरण निर्मिती करण्यासाठी चांगली संधी होती. या संदर्भात बाळा नांदगावकर यांना विचारले असता, निवडणूकांसाठी नाही, तर साहेबांच्या प्रेमापोटी कार्यकर्ते जमले असल्याचे त्यांनी म्हटले.
काय आहे प्रकरण
२६ जानेवारी २०१४ रोजी वाशीमध्ये राज ठाकरे यांनी भाषण केल्यानंतर मनसे कार्यकर्त्यांनी वाशी टोल नाका उद्ध्वस्त केला होता. याप्रकरणी अनेक वेळा कोर्टात हजर राहण्यास सांगूनही राज ठाकरे हजर झाले नव्हते. त्यामुळे बेलापूर कोर्टाकडून वॉरंट जारी करण्यात आले आहे. आज ६ फेब्रुवारी रोजी त्यांना हजर राहण्याचे आदेश कोर्टाने दिले होते. राज ठाकरे हजर न झाल्यास पुढील कारवाई केली जाईल असेही न्यायालयाने स्पष्ट केले होते. याप्रकरणी राज ठाकरेंसह नवी मुंबई मनसे अध्यक्ष गजानन काळे आणि इतर ७ जणांवर वाशी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.
हेही वाचा - जाँटी ऱ्होड्सचे ट्विटर अकाउंट हॅक!..सचिनचे 'ते' ट्विट झाले पोस्ट