ठाणे - कल्याणच्या कोळसेवाडी आणि खडकपाडा पोलिसांनी घरातून पळालेल्या एका अल्पवयीन तरुणासह दोघा तरूणींना हुडकून काढण्यात यश मिळविले आहे. या तिन्ही जणांनी वेगवेगळ्या कारणांमुळे घर सोडून पळ काढला असला तरी पोलिसांनी मात्र सामाजिक बांधिलकीतून या तिघांचे मनपरिवर्तन करण्यातही यश मिळविले आहे.
आई रागवल्याने तरुणीने काढला घरातून पळ
पहिल्या घटनेत कोळसेवाडी पोलीस ठाण्यात ऋषिकेश सुरेश भवारी (24) या कल्याण पूर्वेकडील विजय नगरमधल्या साईप्रकाश सोसायटीत राहणाऱ्या तरूणाने तक्रार दाखल केली होती. त्याची 17 वर्षीय बहीण श्रुती ही 29 मार्च रोजी संध्याकाळी 5च्या सुमारास बेपत्ता झाली. ऋषिकेश हा लोकग्राम येथील पुस्तकाचे दुकानात गेला असताना श्रुती ही घरात कुणालाही काही न सांगता निघून गेली असल्याने कुणीतरी अज्ञात व्यक्तीने आपल्या बहिणीस फुस लावून पळवून नेले असावे, असे त्याने सदर तक्रारीत म्हटले होते. या प्रकरणी पोलिसांनी 30 मार्च रोजी पहाटे 2 वाजता अपहरणाचा गुन्हा दाखल केला. स.पो.नि. ए. आर. भिसे आणि त्यांचे पथक या तरुणीचा शोध घेत होते. शोध मोहिमेदरम्यान ही तरूणी तिची मलंगगड रोडला राहणाऱ्या एश्वर्या मल्ल्या नामक मैत्रिणीकडे राहत असल्याचा सुगावा लागला. तेथून या तरूणीला पोलिसांनी ताब्यात घेतले आणि तिच्या आई-वडिलांसह कल्याण विभागाचे सहायक पोलीस आयुक्त कल्याण अनिल पोवार यांच्यासमक्ष हजर करण्यात आले. घरातील कामे करण्यासाठी आई रागवत असल्याने आपण वैतागून मैत्रीणीकडे रागाच्या भरात निघून गेले होते, असे या तरुणीने सांगितले. मात्र उपस्थित महिला पोलिसांनी या तरुणीचे मनपरीवर्तन तर केलेच, शिवाय तिच्या माता-पित्यालाही समजावून सांगितले. त्यानंतरच या तरूणीला तिच्या माता-पित्याच्या ताब्यात देण्यात आले.