ठाणे -१४ वर्षीय मित्राला दोघा मित्रांनी बहाण्याने एका इमारतीच्या बंद फ्लॅटमध्ये नेले. त्यांनतर त्याच्या गळ्यातील सोनसाखळी काढण्याचा प्रयत्न केला असता, त्याने विरोध केल्याने त्या दोघांनी त्याची गळा आवळून हत्या केली. धक्कादायक बाब म्हणजे हत्या केल्यानंतर त्याचा मृतदेह त्याच बंद फ्लॅटमधील एका सोफ्यामध्ये लपवून ठेवला होता. याप्रकरणी पडघा पोलीस ठाण्यात हत्येचा गुन्हा दाखल करून आरोपी मित्रांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. सोहम गजबे असे मृतक अल्पवयीन मुलाचे नाव आहे. तर अक्षय वाघमारे (२४) आणि त्याचा अल्पवयीन साथीदार असे आरोपीचे नावे आहेत.
सोनसाखळी गहाण ठेवून आरोपींची मैजमजा
मृतक सोहम हा कल्याण-पडघा मार्गावरील बापगाव येथील जय मल्हारनगरमधील एका इमारतीत कुटुंबासह राहत होता. काल दुपारच्या सुमारास आरोपींनी मृतक सोहमला बहाण्याने बोलवून त्याला तो राहत असलेल्या परिसरातील एका इमारतीमधील बंद फ्लॅटमध्ये घेऊन गेले. त्यांनतर त्याच्या गळ्यातील सोनसाखळी खेचत असतानाच मृतक सोहमने विरोध केला. त्यामुळे दोघा आरोपींनी त्याची गळा आळवून हत्या करून त्याच्या गळ्यातील सोनसाखळी काढली आणि त्याचा मृतदेह त्याच ठिकाणी एका सोफ्यात लपवून ठेवला. त्यांनतर दोघानांही मृतकची सोनसाखळी कल्याणातील एका सोनाराकडे १० हजार रुपयात गहाण ठेवून त्यामधून मिळालेल्या पैशांतून मौजमजा केली.