महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

धावत्या रिक्षात तरुणीवर अत्याचाराचा प्रयत्न; नराधमाच्या तावडीतून सुटकेसाठी पीडितेची उडी - physical abuse in thane

धावत्या रिक्षात एका नराधमाने 21 वर्षाच्या तरुणीवर अत्याचार करण्याचा प्रयत्न केल्याची खळबळजनक घटना समोर आली आहे. नराधमाच्या तावडीतून सुटण्यासाठी पीडितेने थेट धावत्या रिक्षातून उडी मारली. यानंतर संबंधित व्यक्तीने देखील तिच्या पाठोपाठ उडी मारून पुन्हा तरुणीला रिक्षात खेचण्याचा प्रयत्न केला.

physical abuse case in thane
धावत्या रिक्षात एका नराधमाने 21 वर्षाच्या तरुणीवर अत्याचार करण्याचा प्रयत्न केल्याची खळबळजनक घटना समोर आली आहे.

By

Published : Feb 10, 2020, 5:58 PM IST

Updated : Feb 10, 2020, 6:04 PM IST

ठाणे -धावत्या रिक्षात एका नराधमाने 21 वर्षाच्या तरुणीवर अत्याचार करण्याचा प्रयत्न केल्याची खळबळजनक घटना समोर आली आहे. नराधमाच्या तावडीतून सुटण्यासाठी पीडितेने थेट धावत्या रिक्षातून उडी मारली. यानंतर संबंधित व्यक्तीने देखील तिच्या पाठोपाठ उडी मारून पुन्हा तरुणीला रिक्षात खेचण्याचा प्रयत्न केला. मात्र, पीडितेने आरडाओरड केल्याने नागरिक धावून आले. त्यामुळे नराधम प्रवाशाने रिक्षाचालकासह पळ काढला. याप्रकरणी अज्ञात नराधम प्रवासी तसेच रिक्षाचालकावर उल्हासनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

21 वर्षाची महाविद्यालयीन तरुणी उल्हासनगर परिसरात वास्तव्यास आहे. शनिवारी सकाळी नऊ वाजण्याच्या सुमारास ती महाविद्यालयात जाण्यासाठी उल्हासनगर रेल्वे स्टेशनकडे निघाली. यासाठी महाराष्ट्र मित्र मंडळ शाळेसमोर उभ्या असलेल्या एका रिक्षात ती बसली. मात्र त्या आधीच एक प्रवासी या रिक्षात बसला होता. रिक्षाचालक त्या दोघांनाच घेऊन उल्हासनगर रेल्वे स्टेशनकडे निघाला. पीडितेच्या शेजारी बसलेल्या नराधम प्रवाशाने धावत्या रिक्षात तिला छळण्याचा प्रयत्न केला.

या घटनेमुळे पीडित तरुणीने घाबरुन चालकाला रिक्षा थांबण्याची विनंती केली. मात्र त्याने वेग वाढवला. रिक्षा थांबत नसल्याचे पाहून तिने नराधमाच्या तावडीतून सुटका करण्यासाठी सी. ब्लॉक रोडवरील धुलीचंद महाविद्यालयासमोर धावत्या रिक्षातून उडी मारली. तिच्या पाठोपाठ या नराधमानेही उडी घेतली; आणि पुन्हा तिच्यावर जबरदस्ती करून रिक्षात नेण्याचा प्रयत्न केला. मात्र पीडितेने आरडाओरडा केल्याने नागरिक धावून आले; आणि नराधमासह रिक्षाचालकाने पळ काढला.

पीडितेने उल्हासनगर पोलीस ठाण्यात दोन्ही अज्ञात नराधमांचे वर्णन सांगून गुन्हा दाखल केला आहे. अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक सचिन शिंदे करत आहेत.

Last Updated : Feb 10, 2020, 6:04 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details