ठाणे - कोरोनाच्या पार्श्वभूमीवर नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. त्यामुळे साध्या आजारांवरदेखील उपचार घेण्यासाठी नागरिकांची रुग्णालयात गर्दी होत आहे. यासाठी महापालिकेने प्रभाग समिती निहाय खासगी डॉक्टरांच्या सहाय्याने बाह्यरुग्ण विभाग (ओपीडी) सुरू केले आहेत. यासाठी येथे रुग्णांकडून 10 रुपये इतकी केसपेपर फी आकारण्यात येत होती. रुग्णांना तत्काळ उपचार मिळावेत व गर्दी टाळावी, यासाठी आता लॉकडाऊन असेपर्यंत रुग्णांकडून केसपेपरसाठीचे 10 रुपये आकारण्यात येणार नाही, अशी माहिती महापौर नरेश म्हस्के यांनी दिली आहे.
हेही वाचा...हैदराबादचे हे डॉक्टर कुटुंब देत आहे कोरोनाशी लढा
लॉकडाऊनच्या परिस्थितीत नागरिकांना साध्या आजारांवरदेखील उपचार मिळावेत, यासाठी महापालिकेच्या विविध भागात आरोग्यकेंद्र सुरू करण्यात आले आहेत. महापालिका आरोग्यकेंद्रातील सर्व डॉक्टर्स हे कोरोनाचा प्रतिबंध करण्याच्या कामात व्यस्त असल्यामुळे खासगी डॉक्टरांच्या मदतीने ओपीडी आरोग्यकेंद्रात रुग्णांना सेवा दिली जात आहे. यासाठी सामाजिक कार्यकर्त्यांनी पुढाकार घेतला असून तेदेखील रुग्णांमध्ये सोशल डिस्टन्सिंग पाळले जावे, यासाठी मदत करत आहेत. या आरोयकेंद्रात येणाऱ्या रुग्णांकडून 10 रुपये केसपेपर फी आकारण्यात येत आहे. त्यामुळे येथे गर्दी होत होती. यावर पर्याय म्हणून सद्यस्थितीत रुग्णांकडून केसपेपरची फी आकारण्यात येवू नये, अशी मागणी वजा निर्देश म्हस्के यांनी आयुक्तांना पत्रान्वये दिले होते.