ठाणे- लोकसभा निवडणुकीचा प्रचार अंतिम टप्यात आल्याने आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झडत आहेत. चार दिवसांपूर्वी शिवसेना-भाजप महायुतीचे उमेदवार राजन विचारे यांची प्रचार रॅली रोखून वाघबीळ गावातून पिटाळून लावली होती. त्यामुळे या वाघबीळ गावात तब्बल 500 पोलिसांचा फौजफाटा तैनात केल्याचा आरोप राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी केला आहे. पोलिसांच्या या दबावतंत्रामुळे ठाण्यातील भूमिपुत्रांमध्ये संताप व्यक्त होत असून याचा थेट परिणाम सेनेच्या व्होट बँकेवर होण्याची चिन्हे दिसत आहेत.
पोलीसांचा फौजफाटा आणि बोलताना जितेंद्र आव्हाड
ठाणे लोकसभा मतदार संघात काँग्रेस-राष्ट्रवादी महाआघाडीकडून आनंद प्रकाश परांजपे तर, शिवसेना-भाजप महायुतीकडून राजन विचारे हे रिंगणात आहेत. या दोन्ही उमेदवारांमध्येच तुल्यबळ लढत रंगली असून प्रचारात आणि विविध संघटना व समाजांच्या पाठिंब्यावरूनही दोन्ही पक्षांमध्ये चुरस वाढली आहे. दोन दिवसांपूर्वी अखिल भारतीय ब्राम्हण महासंघाने उमेदवार आनंद परांजपे यांना जाहीर पाठिंबा दर्शविल्यानंतर सेनेच्या गोटात खळबळ उडाली. त्यानुसार, आधी सकल ब्राम्हण महासंघाने सेनेच्या विचारे यांना तर, शुक्रवारी समस्त ब्राह्मण महासंघाने ठाणे व पालघरमधील महायुतीच्या चारही उमेदवारांना पाठिंबा जाहीर केल्याने संभ्रम निर्माण झाला आहे.
याबाबत बोलताना आमदार आव्हाड यांनी युतीवर चांगलेच ताशेरे ओढले. ब्राह्मण समाजाने परांजपे यांना पाठिंबा दर्शविल्यानेच यांचा पोटशूळ उठला आहे. आम्ही भारतात धर्म व जातीपातीच्या विरोधात असून सर्वधर्मसमभाव मानणारे आहोत. तेव्हा, सुसंस्कृतपणा म्हणजे काय ? असा सवाल करीत आव्हाड यांनी, दिल्लीच्या महाराष्ट्र सदनातील गरीब कर्मचाऱ्यांच्या तोंडात चपाती कोंबणारे खासदार विचारे हे सुसंस्कृत कसे ? तसेच, सुसंस्कृतपणाचा आव आणून पत्रकार परिषद घेणाऱ्यानी त्यांच्या संघटनेची नोंदणी कधी, कुठे झाली कार्यालय कुठे याचाही खुलासा करावा, असे जाहीर आव्हान दिले.
विद्यमान खासदार राजन विचारे आणि त्यांचे नेते निवडून आल्यानंतर एकदाही गावात फिरकले नसल्याचा आरोप नाही. त्यामुळे वाघबीळ येथील गावकऱ्यांनी शिवसेनेची रॅली रोखत पिटाळून लावले होते. तेव्हा, स्थानिक महिलांची पोलिसांशी झटापटीदेखील झाली होती. या घटनेनंतर वाघबीळ गावात सुमारे 500 पोलिसांची फौज तैनात केल्याचा आरोप आमदार आव्हाड यांनी केला आहे. या गावात भूमिपुत्रांसह विविध जातीधर्माचे सुमारे 5 हजार नागरिक राहतात. यात आगरी कोळी समाजाचे वास्तव्य मोठ्या प्रमाणात असून येथील भूमिपुत्र शिवसेना नेतृत्वाच्या विरोधात आहेत. या नेतेमंडळीची राजकारणातही मक्तेदारी असून येथील इतर धंदे व्यवसायातही यांचीच दादागिरी असते. यातूनच हा उद्रेक झाल्याचे आव्हाड म्हणाले.