नवी मुंबई -दारूच्या नशेत केबिनमध्ये लघुशंका व दिर्घशंका केल्याच्या रागातून एका सुरक्षा रक्षकाने दुसऱ्या सुरक्षारक्षकाची हत्या केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. संबधित घटना वाडीलाल केमिकल्स कंपनी तुर्भे येथे घडली. याप्रकरणी आरोपी सुरक्षा रक्षकास ताब्यात घेतले आहे.
विनोदभाई सदाशिव पाटील (48) या सुरक्षा रक्षकाला दारूचे व्यसन होते. त्याने दारूच्या नशेत वाडीलाल केमिकल्स लिमिटेड कंपनी तुर्भे एमआयडीसी केबिनमध्ये लघुशंका व दिर्घशंका केली. याचा प्रचंड राग तिथेच सुरक्षा रक्षक म्हणून काम करणाऱ्या, भानुसिंग चरणसिंग तोमर (37) याला आला. तोच राग मनात धरून त्याने विनोदभाई पाटील याला बुटाने व काठीने मारहाण केली. त्यामुळे संबधित सुरक्षा रक्षकास गंभीर दुखापत झाली व त्यातच त्याचा मृत्यू झाला.
तुर्भे एमआयडीसी पोलिसांनी केले आरोपी सुरक्षा रक्षकास अटक-
तुर्भे एमआयडीसी पोलिसांनी तांत्रिक तपासाच्या आधारे भानुसिंग तोमर याला ताब्यात घेतले. अधिक चौकशीत त्याने गुन्हा कबूल केला. त्याला पोलीस कोठडीत ठेवण्यात आले आहे. पुढील तपास सहायक पोलीस निरिक्षक दीपक डोंब करीत आहेत.