ठाणे - कोविडच्या पार्श्वभूमीवर यंदाही दहीहंडी सण साजरा करण्यावर राज्य सरकारने निर्बंध आणले असून दहीहंडी उत्सव यंदाही रद्द करण्यात आला आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी बोलवलेल्या बैठकीत ही भूमिका घेतली. मात्र, त्यानंतर ठाण्यात महाराष्ट्र नवनिर्माण सेना दहीहंडीचा उत्सव साजरा करणार आहे. या पार्श्वभूमीवर गोविंदा पथकांना आवाहन करण्यात आले असल्याचे मनसेचे ठाणे - पालघर जिल्हा अध्यक्ष अविनाश जाधव यांनी सांगितले आहे. त्यामुळे दहीहंडी करणारच या मुद्यावर मनसे ठाम असून गुन्हे दाखल झाले तरी चालेल, मात्र हिंदूंच्या सण आम्ही मोठ्या जल्लोषात साजरे करणार असल्याचा पवित्रा मनसेने घेतला आहे.
ठाण्यात दहीहंडी करण्यावर मनसे ठाम - अविनाश जाधव - ठाणे दहीहंडी बातमी
कोरोनाचे संकट अद्याप कमी झाले नसले तरीही सर्व आस्थापनांना उघडण्याची मुभा देण्यात आली आहे. ज्यानी लसीचे दोन डोस घेतले आहेत, त्यांना अनेक गोष्टींना परवानगी देण्यात आली आहे. दहीहंडीच्या सणामध्येही दोन डोस घेतले आहेत. त्यांनाच परवानगी देण्यात यावी, हंडीची उंची कमी असावी.
अविनाश जाधव
गोविंद पथकांना दहीहंडी लावण्याचे आवाहन
मनसेचे ठाणे-पालघर जिल्हा अध्यक्ष अविनाश जाधव यांनी गोविंदा पथकांना जर तुम्ही थर लावायला तयार असाल तर मी दहीहंडी बांधायला तयार आहे असे आवाहन गोविंदा पथक मंडळांना केले आहे. सरकारला सभा,मेळावे, उद्घाटन करताना केलेली गर्दी चालते. तेव्हा कोरोना होत नाही मग मराठी सण साजरे करण्यावर बंदी का, असा सवाल देखील अविनाश जाधव यांनी उपस्थित केला आहे. त्यामुळे ठाणे मनसे दहीहंडी उत्सव साजरा करण्यावर ठाम असल्याचे दिसून येत आहे.
सरकारकडून तरुणाईची दखलच नाही
कोरोनाच्या नावाखाली राज्य सरकारने दहीहंडीला परवानगी नाकारणे संतापजनक आहे. दहीहंडीसंबधात मुख्यमंत्र्यासमवेत पार पडलेल्या समन्वय समितीच्या बैठकीला विश्वविक्रम केलेल्या एकाही नामांकित गोविंदा पथकांना निमंत्रित केले गेले नव्हते. जे उपस्थित होते त्यांना बोलण्याची संधीही दिली नाही. केवळ सणांवर बंदी असून सरकारमध्ये असलेल्या राजकीय पक्षांच्या कार्यक्रमाला सूट हा कोणता न्याय असा सवाल यावेळी जाधव यांनी उपस्थित केला. यात काहीही झाले तरीही दहीहंडी साजरी करणाऱ्या मंडळांच्या पाठीशी मनसे ठामपणे उभी राहील. असा थेट इशाराच मनसेचे ठाणे व पालघर जिल्हाध्यक्ष अविनाश जाधव यांनी सरकारला दिला आहे.