मीरा भाईंदर - महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने शहरातील पाणी प्रश्नाबाबत निदर्शने करण्यात आली. या दरम्यान शहरातील कार्यकर्त्यांनी १२ पाण्याच्या टाकीवर जाऊन पालिका प्रशासनाच्या विरोधात आंदोलन केले.
शहरातील १२ पाण्याच्या टाक्यांवर मनसेचे आंदोलन मागील अनेक दिवसांपासून पाण्यावरून शहरातील राजकीय वातावरण तापले आहे. प्रशासनाकडून सुरळीतपणे पाणी पुरवठा होत नसल्याने नागरिकही त्रस्त झाले आहे. एमयडीसीकडून पाणी पुरवठा वारंवार खंडित केला जातो. त्यामुळे शहरातील पाणी टंचाईचा मोठा प्रश्न निर्माण झाला आहे. शहरातील १२ पाण्याच्या टाकीवर जाऊन मनसैनिकांनी पालिका प्रशासनाचा निषेध केला. तर काशीमीरा परिसरातील टाकीवर मनसेच्या महिला जिल्हाअध्यक्षा कविता वायगणकर यांनी टाकीवर चढून निषेध केला. यावेळी पोलिसांनी अनेक मनसैनिकांना ताब्यात घेतले. आंदोलना स्थळी पाणी पुरवठा विभागाचे मुख्य कार्यकारी अभियंता श्री सुरेश वाकोडे यांनी स्वतः भेट दिली. तेव्हा यावेळी मनसेकडून लेखी पत्र देण्यात आले. सत्ताधारी पक्षाने पुसली तोंडाला पाने सत्ताधारी पक्षाने निवडणुकीपूर्वी फक्त नावाला कागदोपत्री २१५ एमएलडी पाणी पुरवठ्याचे आश्वासन दिले होते. आणि त्यानंतर मोठी होर्डिंग लावून नागरिकांची फसवणूक केली. शहरातील नागरिकांना चोवीस तासात एकदाही पाणी मिळत नाही. आठवडाभरातून किमान तीन ते चार दिवस जलवाहिनीच्या दुरुस्तीच्या कारणास्तव पाणी पुरवठा बंद असतो. संपूर्ण नवरात्र पाण्यावाचून गेली. त्यामुळे आता तरी शहरातील नागरिकांच्या सहनशीलतेचा अंत झालेला आहे, असेही माहिती मनसे नेते संदीप राणे यांनी सांगितले.