ठाणे - मनसे जिल्हाअध्यक्षांनी चार दिवसापूर्वी खड्डे बुजविण्याचे अल्टिमेट देऊनही रस्त्यावरील खड्डे जैसे थे असल्याचे पाहून भिवंडी तालुक्यातील खारबाव - माळोडी टोलनाका मनसे स्टाईलने खळ्खट्याक करून मनसेसैनिकांनी फोडल्याची घटना घडली आहे. मात्र, अचानक टोलनाक्यावर मनसे कार्यकर्त्यांचा धुडघूस पाहून टोल नाक्यावरील कर्मचाऱ्यांनी यावेळी पळ काढला होता.
चार दिवसापूर्वीच दिला होता इशारा -
जिल्ह्यात विविध शहरात पावसामुळे खड्ड्यांनी डोकेवर काढले. त्यातच भिवंडी तालुक्यातील मानकोली ते वसई-कामण-चिंचोटी फाटा राज्यमार्गावरील अंजुरफाटा ते खारबाव रस्ता खाजगीकरणातून बनविण्यात आला. मात्र, हा राज्यमार्गाची खड्यांमुळे अत्यंत दुरवस्था झाली होती. याच खड्यांच्या राजकारणात मनसेही रस्त्यावर उतरणार असल्याचा इशारा महाराष्ट्र नवनिर्माण सेना ठाणे व पालघर जिल्हाअध्यक्ष अविनाश जाधव यांनी चार दिवसापूर्वी सांगितले होते. तसेच या रस्त्या बाबत गांभीर्य बाळगून दुरुस्ती न केल्यास या रस्त्यावरील टोल वसुली कायमस्वरूपी बंद पडण्याचा इशाराही दिला होता.
कोट्यावधी रुपये खड्यांवर खर्च, तरीही चांगले रस्ते नाहीत -
केंद्रीय राज्यमंत्री कपिल पाटील यांनी जिल्ह्यातील रस्त्यांच्या कामे ठेकेदारांमुळे निकृष्ट व संथगतीने होत असल्याचा आरोप केला होता. त्याचाच हवाला देत मनसेचे जिल्हा अध्यक्ष अविनाश जाधव यांनी राज्यशासनावर सडकून टीका करीत ठाणे जिल्हा परिषद, पंचायत समितीमध्ये शिवसेनेची सत्ता असताना कोट्यवधी रुपये दुरुस्तीवर खर्च करून ही सामान्य नागरिकांना चांगले रस्ते का देत नाहीत, असा प्रश्न उपस्थित केला होता.