ठाणे -गणेश नाईक राष्ट्रवादी सोडणार हे 2014 मध्येच ठरले होते. वारंवार पक्षाला सांगूनही पक्षाने नेहमी नाईकांना वरची बाजू दिली. परंतु मागील पाच वर्षात नाईकांनी राष्ट्रवादी संपवली आणि आज पक्ष अडचणीत असताना पक्षाला उभारी देण्याऐवजी ते आपला स्वार्थ साधण्याचे काम करीत असल्याचा आरोप राष्ट्रवादीचे राष्ट्रीय सरचिटणीस तथा आमदार जितेंद्र आव्हाड यांनी केला आहे.
मागील काही दिवसांपासून नाईक कुटुंब हे भाजपमध्ये जाणार याची चर्चा सुरू होती. त्यानंतर मंगळवारी संदीप नाईक यांनी आपला राजीनामा दिला आणि सुरू असलेल्या या चर्चांना पूर्णविराम लागला. यावर आव्हाडांनी नाराजी व्यक्त केली. नाईकांच्या या निर्णयाविरोधात बोलताना ते भाऊक झाल्याचे दिसून आले.
नाईक हे बंधुतुल्य सहकारी ते कधीही गद्दारी करणार नाही असे पवार साहेब बोलायचे
गणेश नाईक यांनी पध्दतशीरपणे राष्ट्रवादी संपवण्याचे काम केले आहे. या संदर्भात मी वारंवार पक्षाला याची माहिती देत होतो, मात्र माझे दुर्देव असे की माझ्यावर किंवा माझ्या बोलण्यावर पक्षाने विश्वास ठेवला नाही. याउलट नाईक यांना नेहमीच वरची बाजू पक्षाने दिली. 2014 मध्येच नाईक भाजपमध्ये जाणार होती. परंतु पवार साहेबांनी नाईक हे आपले बंधुतुल्य सहकारी असल्याचे सांगत ते कधीही गद्दारी करणार नाहीत, असे बोलले होते. मात्र, नाईकांनी मागील पाच वर्षात राष्ट्रवादीला खड्यात घालण्याचे काम केले.
नाईकांनी राष्ट्रवादीला संपविण्याचा विडाच उचलला होता
कल्याण डोंबिवलीत सत्ता असताना आज त्या ठिकाणी एकही नगरसेवक नाही. हीच परिस्थिती भिवंडी आणि मिराभाईंदरमध्येही आहे. या सर्वांचे नेतृत्व नाईकच करीत होते. घरी बसून पक्ष चालत नाही, हे त्यांना समजायला हवे होते. मात्र, राष्ट्रवादीला संपविण्याचा विडाच त्यांनी उचलला होता, असा आरोपही आव्हाडांनी केला आहे.