मीरा भाईंदर (ठाणे) -भाईंदर पश्चिमेच्या गणेश देवल येथील समाज मंदिरात दारुड्यांनी धिंगाणा करत तृतीयपंथासोबत अश्लिल नृत्य केल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. यावर पालिका प्रशासन समाज मंदिरात, असामाजिक काम करणाऱ्याविरोधात कोणती कारवाई करणार असा प्रश्न स्थानिक नागरिकांमधून विचारला जात आहे.
समाज मंदिराचा होतोय दुरूपयोग
पालिका प्रशासन लाखो रुपयांचा निधी खर्च करून समाज मंदिर बांधते. समाजाच्या कल्याणासाठी वापरण्यात येणाऱ्या या समाज मंदिरात असे घाणेरडे प्रकार सुरू असल्याचे समोर आले आहे. दारुड्यांचा तृतीयपंथीयासोबत नृत्य करत असल्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या व्हिडीओमध्ये नृत्य करत एक व्यक्ती पैशांची उधळपट्टी करताना पाहायला मिळत आहे. समाज मंदिरातील पालिकेच्या सामानाचे देखील या तळीरामांनी नुकसान केले. मात्र, पोलीस आणि पालिका प्रशासनाने यावर अद्याप कोणतीही कारवाई केलेली नाही.