ठाणे : आपल्या पित्याचा जास्त आदर कोण करतो, या कारणावरुन दोघा मित्रांमध्ये वाद झाला. गावी जाऊन एकमेकांच्या वडिलांना विचारायचे की कोण तुम्हाला जास्त सन्मान देतो, असे या मित्रांनी ठरवले खरे, पण डोंबिवली सोडण्याआधीच दोघा मित्रांतील वाद शिगेला पोहोचला आणि त्यात एकाला जीव गमवावा लागला. बेचन चौहान याची हत्या केल्याची त्याचा मित्र बबलू चौहान याने तीन दिवसानंतर पोलिसांना कबुली दिली. आता हे प्रकरण टिळकनगर पोलिसांकडून लोहमार्ग पोलिसांकडे खुन्यासह वर्ग करण्यात आले आहे. तर हत्या प्रकरणाला तीन दिवसानंतर नाट्यमय कलाटणी मिळाली आहे. मित्रानेच मित्राची हत्या करुन स्वतःच्या बचावासाठी लुटीचा बनाव केला खरा, मात्र हा बनाव टिळकनगर पोलिसांनी उघडकीस आणला. खुनी बबलू चौहान याला बेड्या ठोकल्या नंतर त्याने आपल्या मित्राच्या हत्येचे कारण पोलिसांसमोर उघड केले.
आरोपी मित्राने असा रचला बनाव
रेल्वे रुळावरील हत्या प्रकरणाला कलाटणी; जन्मदात्याच्या आदरातिथ्यावरून हत्या झाल्याचे उघड - बेचन चौहान
रेल्वे रुळावरील हत्या प्रकरणाला नवे वळण मिळाले आहे. मित्राची हत्या करुन स्वतःच्या बचावासाठी लुटीचा दावा केल्याचे उघड झाले. वडिलांना जास्त सन्मान देतो, या कारणावरुन दोघांमध्ये भांडण झालं. आपण गावी जाऊन एकमेकांच्या वडिलांना विचारायचे की कोण तुम्हाला जास्त सन्मान देतो, असे त्यांनी ठरवले. दारुच्या नशेत बबलूने बेचन प्रसादची हत्या केली. त्यानंतर त्याचा मृतदेह रेल्वे ट्रॅकवर टाकून दिला होता.
शेलार नाका परिसरात राहणारे बेचन चौहान आणि बबलू चौहान हे दोघे मित्र सोमवारी रात्री आपल्या मूळगावी उत्तरप्रदेशला जाण्यासाठी कल्याणच्या दिशेने रिक्षातून निघाले होते. लुटीच्या इराद्याने तीन जणांनी रिक्षामधून खाली उतरून मला आणि माझ्या मित्राला मारहाण केली, मी कसाबसा वाचून आलो आहे. माझा मित्र अजून सापडलेला नाही, असे बबलूने पोलिसांना सांगितले. ठाकुर्ली-खंबाळपाडा परिसरात असलेल्या 90 फीट रोडजवळच्या रेल्वे ट्रॅकवर बेचनचा मृतदेह छिन्नविच्छिन्न अवस्थेत पडला होता. बबलूच्या सांगण्यानुसार बेचन याची हत्या लुटारुंनी केली, असा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात आला. मात्र लूट झाली असली तरी दोघांची बॅग आणि मोबाईल घटनास्थळी सापडल्याने हा लूट करण्यासाठी प्रकार घडला नसावा, असा पोलिसांनी कयास बांधून तपास सुरू केला. जखमी बबलूची पोलिसांनी चौकशी सुरू केली. मात्र बबलू उलटसुलट माहिती देत असल्याने पोलिसांना संशय आला. कल्याणचे डीसीपी सचिन गुंजाळ, एसीपी जय मोरे आणि टिळकनगरचे वपोनि अजय आफळे यांच्या मार्गदर्शनाखाली तपास सुरु असतानाच या प्रकरणाला कलाटणी मिळाली. बबलूने आपला मित्र बेचनची हत्या केल्याची कबुली दिली.
खुनी लोहमार्ग पोलिसांच्या ताब्यात -
सोमवारी संध्याकाळी आपल्या वडिलांचा जास्त आदर कोण करतो, यावरुन दोघांत वाद झाला. आपण गावी जाऊन एकमेकांच्या वडिलांना विचारायचे की कोण तुम्हाला जास्त सन्मान देतो, असे त्यांनी ठरवले. गावी जाण्यापूर्वी दोघांनी दारूवर झोड घेतली. तर्राट झालेले दोघे मित्र रिक्षातून जात असताना 90 फिट रोडवर त्यांच्यात या मुद्द्यावरुन वाद निर्माण झाला. या वादात बबलूने आपल्याकडे असलेल्या धारदार शस्त्राने बेचनची हत्या केली. त्याचा मृतदेह रेल्वे ट्रॅकवर टाकून तो पसार झाला. मात्र लुटीचा बनाव निर्माण करणाऱ्या बबलूला टिळकनगर पोलिसांनी डोंबिवली लोहमार्ग पोलिसांच्या ताब्यात दिले आहे. आता या खुनाचा पुढील तपास लोहमार्ग पोलिसांनी सुरू केला आहे.
हेही वाचा -नोबेल 2021 : साहित्यातील नोबेल अब्दुलरझाक गुर्नाह यांना जाहीर