ठाणे - मुंबई एन्ट्री पॉइंट्स वर आजपासून टोल दरवाढ लागू होत आहे. एकीकडे कोरोनाचे संकट दुसरीकडे लोकल बंद अशा वेळी सर्वसामान्य नागरिकांना रस्त्याचा वापर करवा लागत आहे. त्यात झालेली ही दरवाढ सरकारने मागे घ्यावी, म्हणून आज ऐरोली टोल नाक्यावर मनसेने आंदोलन हाती घेतले आहे. यावेळी काही वाहने मोफत सोडण्यात आली. मात्र काही वेळानंतर नंतर पोलिसांनी त्यांना बाजूला करत टोल नाका पुन्हा सुरू केला. आज सौम्य आंदोलन करत असून भविष्यात तीव्र आंदोलनाचा इशारा मनसेने दिला आहे.
टोल दरवाढी विरोधात मनसे आक्रमक...ठाण्यात गाड्या मोफत सोडल्या सध्या सर्वत्र लॉकडाऊन मुळे आर्थिक डबघाईची परिस्थिती असताना आता त्यात टोल दरवाढीचा भुर्दंड सहन करावा लागणार आहे. मुंबईच्या प्रवेशद्वारावर असलल्या टोलच्या दरांमध्ये आता वाढ केली जाणार आहे. ही वाढ पाच रुपयांपासून ते पंचवीस रुपयांपर्यंत असेल. एकीकडे लोकल बंद असताना, टोल दरवाढीमुळे मुंबईत ये-जा करणाऱ्या लाखो वाहनधारकांना आता आर्थिक फटका बसणार आहे.
मुंबईत प्रवेश करण्यासाठी पाच मार्गांचा वापर करण्यात येतो. दहिसर, ऐरोली, वाशी, आनंद नगर (मुलुंड) आणि लाल बहादूर शास्त्री मार्ग (मुलुंड) या पाचही प्रवेशद्वारांवर एम ई पी कंपनीचे टोल नाके आहेत. एक ऑक्टोबरपासून या टोलचे नवीन दर लागू होतील. त्यानुसार 5 रुपयांपासून ते 25 रुपयांपर्यंत टोल दर वाढवण्यात येतील. याचा मोठा फटक वाहनचालकांना बसणार आहे.
टोलचे नवे दर
छोटी वाहने – ४० रुपये ( आधी ३५)
मध्यम अवजड वाहने – ६५ रुपये (आधी ५५)
ट्रक आणि बसेस – १३० रुपये ( आधी १०५)
अवजड वाहने – १६० रुपये ( आधी १३५)
पाचही नाक्यांसाठी असलेला मासिक पास- १५०० ( आधी १४००)
एका टोलसाठी असलेला मासिक पास - १२४०
मुंबईत बांधलेल्या 55 उड्डाणपुलाच्या उभारणीचा खर्च वसूल करण्यासाठी हे टोलनाके उभारण्यात आले होते. महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळ सोबत झालेल्या एम ई पी कंपनीच्या करारानुसार 2002 ते 2027 अशा पंचवीस वर्षांसाठी मुंबईच्या प्रवेशद्वारांंवर टोल वसूल करण्यात येणार आहे. तसेच दर तीन वर्षांनी या टोळीच्या किंमतीमध्ये वाढ करण्याची तरतूद या करारात आहे. त्यामुळेच 2017 नंतर आता 2020 मध्ये टोल दर वाढ केली जात आहे.