ठाणे- मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांच्या विरोधात ठाणे पोलिसांनी लूक आऊट नोटीस जारी करण्यात आल्याची सूत्रांची माहिती आहे. परमबीर सिंह यांच्यासह 28 जणांविरोधात लूक आऊट नोटीस जारी करण्यात आली. क्रिकेट बुकी सोनू जालान यांनी सिंह यांच्याविरोधात तक्रार दाखल केली होती.
परमबीर सिंह यांच्यासह 28 जणांविरोधात लूक आऊट नोटीस जारी - लूक आऊट नोटीस
मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांच्या विरोधात ठाणे पोलिसांनी लूक आऊट नोटीस जारी करण्यात आल्याची सूत्रांची माहिती आहे. परमबीर सिंह यांच्यासह 28 जणांविरोधात लूक आऊट नोटीस जारी करण्यात आली. क्रिकेट बुकी सोनू जालान यांनी सिंह यांच्याविरोधात तक्रार दाखल केली होती.
तक्रारदार केतन तन्ना, सोनू जालान आणि रियाज भाटी या तिघांनी परमबीरसिंग आणि त्यांचे २७ सहकाऱ्यांच्या विरोधात तक्रार दाखल केली होती. ठाणे नगर पोलिसांनी गुरुवारी सोनू जालान यांचा जबाब नोंदविला होता. तर शुक्रवारी केतन तन्ना आणि रियाज भाटी यांचा जबाब नोंदवून अखेर ठाणे नगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.
2018 मध्ये मोक्का अंतर्गत कारवाई करून उकळले 3 कोटी 45 लाख
2018 मध्ये ठाणे पोलीस आयुक्तपदी असणाऱ्या परमबीर सिंग यांच्याकडून मोक्का खाली सोनू जालान याच्यावर कारवाई करण्यात आल्यानंतर तब्बल 3 कोटी 45 लाख रुपये उकळण्याचा आरोप सोनू जालान याने केला आहे. यासंदर्भातील तक्रार अर्ज क्रिकेट बुकी सोनू जालान याने मुख्यमंत्री कार्यालय, गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील व पोलीस महासंचालक यांना केल्याची माहिती मिळत आहे.
ठाणे पोलीस आयुक्त असताना क्रिकेट बुकी सोनू जालान याच्यावर मोक्का अंतर्गत कारवाई करण्यात आली होती. त्यावेळेस ठाणे पोलीस विभागातील तत्कालीन पोलीस अधिकारी एन्काऊंटर स्पेशालिस्ट प्रदीप शर्मा व कोथमिरे नावाच्या अधिकार्यांवर सुद्धा सोनू जालान याने आरोप केलेले आहेत. याबरोबरच केतन तन्ना नावाच्या व्यक्तीने परमबीर सिंग यांच्यावर आरोप करत त्याच्याकडून 1 कोटी 25 लाख रुपये धमकी देऊन वसूल केल्याचा आरोप त्याने केलेला आहे. यासंदर्भात राज्य सरकारकडून योग्य ती चौकशी करण्यात यावी व यामध्ये दोषी आढळणाऱ्या विरोधात कारवाई करण्यात यावी, अशी मागणी क्रिकेट बुकी सोनू जालान व केतन तन्ना या दोघांनी केली आहे.