ठाणे -कल्याण डोंबिवली महापालिकेच्या स्थायी समिती सभापतीची निवडणूक शुक्रवारी पार पडली. मात्र, या निवडणुकीत महाविकास आघाडीत फूट पडल्याचे दिसून आले. शिवसेनेच्या कब्जात असलेली समितीच्या तिजोरीची चावी मनसे आणि काँग्रेसच्या सदस्यांच्या मतदानामुळे भाजपच्या हाती लागली आहे. महापालिकेच्या स्थायी समिती सभापती पदासाठी झालेल्या अटीतटीच्या लढतीत भाजपचे विकास म्हात्रे हे सभापती म्हणून निवडून आले आहेत.
कल्याण डोंबिवली महानगरपालिका स्थायी समिती सभापती पदाची निवडणूकीत भाजपची बाजी... हेही वाचा... 'मोदी कायम पाकिस्तानबद्दल बोलतात, ते काय पाकिस्तानातचे राजदूत आहेत का'?
महानगपालिकेच्या स्थायी समितीत शिवसेनेकडे आठ सदस्य आहेत. मात्र, ऐनवेळी निवडणुकीत शिवसेनेचे सदस्य वामन म्हात्रे गैरहजर राहिले, तर मनसेचे सरोज भोईर आणि काँग्रेसच्या हर्षदा भोईर या सदस्यांनी भाजपला मतदान केले. त्यामुळे भाजपचे विकास म्हात्रे यांना 8 मते तर शिवसेनेचे गणेश कोट यांना 6 मत पडली. या अटीतटीच्या लढतीत भाजपचे विकास म्हात्रे हे दोन मतांनी स्थायी समितीच्या सभापती पदावर निवडून आले.
स्थायी समितीत शिवसेनेचे आठ भाजपचे सहा काँग्रेसचा एक आणि मनसेचा एक असे पक्षीय बलाबल आहे. या निवडणुकीच्या वेळी माजी राज्यमंत्री रवींद्र चव्हाण आणि भाजपचे नगरसेवक, कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
हेही वाचा... दोन्ही उमेदवारांना समान मते, औरंगाबाद जिल्हा परिषद निवडणूक स्थगित
ठाणे महानगरपालिका आणि उल्हासनगर महानगरपालिकेत भाजपच्या झालेल्या पराभवाचा बदला, आम्ही कल्याण डोंबिवली महापालिकेच्या स्थायी समिती सभापती पदाच्या निवडणुकीत घेतल्याची प्रतिक्रिया भाजपचे डोंबिवलीचे आमदार तथा माजी राज्यमंत्री रवींद्र चव्हाण यांनी दिली. हा विजय सत्याचा असून सत्याच्या बाजूला मनसे आणि काँग्रेस उभी राहिली असल्याचेही त्यांनी म्हटले. विशेष म्हणजे शिवसेनेचे गणेश कोट यांना आपल्या विजयाची खात्री असल्याने त्यांच्या कार्यकर्त्यांनी सकाळपासूनच रस्तोरस्ती बॅनर लावण्याची सुरुवात केली होती. मात्र, त्यांचा पराभव होताच शहर परिसरातील लावण्यात आलेले बॅनर पुन्हा काढण्यात आले.
हेही वाचा... सत्तेसाठी लाचार शिवसेना सावरकरांच्या मुद्यावर गप्प का?