ठाणे -कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेने (केडीएमसी) ई प्रभाग क्षेत्रातील मानगाव-ऊबर्ली क्रॉस रोड या परिसरातील १०० अनधिकृत चाळींवर बुलडोझर चालवत त्या जमीनदोस्त केल्या. रविंद्र ठाकूर, अशोक ठाकूर (जमीन मालक) आणि अनिल भोईर (बांधकामधारक) हे या ठिकाणी अनधिकृत चाळी बांधत होते.
अनधिकृत बैठ्या चाळीतील घरांवर केडीएमसीचा बुलडोझर - KDMC
केडीएमसीने 100च्या आसपास अनधिकृत बैठ्या चाळीतील घरावर बुलडोझर चालवत त्या चाळी शनिवारी जमीनदोस्त केल्या.
या परिसरातील चाळी अनधिकृत असल्याने तिला निष्कासित करण्याच्या सूचना यापूर्वी महापालिका आयुक्त गोविंद बोडके यांनी प्रभाग क्षेत्र अधिकारी आणि या विभागाचे उपायुक्त सुनिल जोशी यांना दिल्या आहेत. तत्पूर्वी प्रभाग क्षेत्र अधिकारी रविंद्र गायकवाड यांनी जमिन आणि बांधकामधारकांना महाराष्ट्र महापालिका अधिनियमातील तरतूद २६०, ४७८ आणि ३७९ अन्वये विहित कायर्पध्दतीचा अवलंब करून नोटीस बजावली. त्याअनुषंगाने मानपाडा पोलीस ठाण्यात एमआरटीपी अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला.
चाळी निष्कासित करतेवेळी 'ई' प्रभाग कार्यालयाचे प्रभाग क्षेत्र अधिकारी अरुण वानखेडे, 'फ' प्रभाग अधिकारी अरुण भालेराव आणि त्याच्या अधिनस्त असलेले प्रभागातील कर्मचारी या तोडक मोहिमेत सामिल झाले होते. मानपाडा पोलीस आणि महापालिकेच्या पोलीस कर्मचाऱ्यांच्या बंदोबस्तासह ३ जेसीबी, १ पोकलेन आणि कॉम्प्रेसरच्या साहाय्याने ही कारवाई करण्यात आली.