ठाणे -कामावरून काढण्याची धमकी देत ३० वर्षीय कामगार महिलेवर कंपनीच्या मालकासह त्याच्या वाहन चालकानेही बलात्कार केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. ही घटना भिवंडी तालुक्यातील मानकोली नाका येथे अंजुर फाटा रोडवरील महावीर कंपाऊंडमधील धाग्याच्या कंपनीत घडली.
कामावरून काढण्याची धमकी देत महिलेवर कंपनी मालकासह चालकाने केला बलात्कार
नराधम कंपनीच्या मालकाने कामगार महिलेला कामावरून काढून टाकण्याची धमकी दिली होती. तिच्या असाह्यतेचा फायदा घेऊन तिच्यावर जबरदस्ती करण्यात आली. आरोपी मालकाच्या वाहन चालकानेही पीडितेवर अत्याचार केले. दोघा आरोपींवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
पीडित महिलेने नारपोली पोलीस ठाण्यात कंपनीच्या मालकासह त्याच्या वाहन चालकावर बलात्काराचा गुन्हा दाखल केला आहे. सुभाष गोपाळ मालुसरे (वय ४० वर्षे, रा. गौतम नगर, कुर्ला) असे गुन्हा दाखल झालेल्या कंपनी मालकाचे नाव तर संतोष जाधव उर्फ बाबू (वय ३५ वर्षे, रा. कुर्ला) असे चालकाचे नाव आहे.
मिळालेल्या माहितीनुसार पीडित महिला ही अंजुर गावात राहणारी असून ती आरोपी मालुसरे याच्या कंपनीत कामगार म्हणून कार्यरत होती. काही दिवसांपूर्वी नराधम कंपनीच्या मालकाने तिला कामावरून काढून टाकण्याची धमकी दिली. तिच्या असाह्यतेचा फायदा घेऊन तिला कंपनीतील एका रूममध्ये नेऊन शारीरिक संबंध ठेवण्यास भाग पाडले. त्यानंतर नराधम वाहनचालक बाबूनेही तिला धमकी देऊन तिच्यावर बलात्कार केला. या दोघा नराधमांच्या वारंवार होणाऱ्या अत्याचारामुळे पीडित महिला भयभीत झाली होती. अखेर पीडित महिलेने नारपोली पोलीस ठाण्यात बलात्काराचा गुन्हा दाखल केला आहे. बलात्काराचा गुन्हा दाखल होताच दोघेही बलात्कारी फरार झाले असून या गुन्ह्याचा अधिक तपास सहायक पोलीस निरीक्षक लक्ष्मण चव्हाण करत आहेत.