ठाणे- अंबरनाथ पूर्व येथे पतीने सततच्या भांडणाला कंटाळून पत्नीची हत्या केल्याची घटना घडली. आरोपीने पोलीसांना फोन केल्यानंतर पोलीसांनी तत्काळ घटनास्थळी जाऊन पतीला अटक केले. दिपक भोई (वय 41) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे.
पत्नीची हत्या करून पतीनेच केला पोलीस ठाण्यात फोन
सततच्या भांडणाला कंटाळलेल्या पतीने रागाच्या भरात पत्नीची ओढणीच्या सहाय्याने गळा आवळून हत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. घटनेची माहिती मिळताच शिवाजीनगर पोलीसांनी आरोपीला अटक केली.
पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी दीपक यास एक मुलगा व मुलगी असुन तो पत्नी रूपाली (वय 39) व मुलांसोबत अंबरनाथ पूर्वेकडील रिलायन्स रेसिडेन्सीमध्ये राहत होता. दोघा पती-पत्नींमध्ये घरातील किरकोळ कारणावरून सतत वाद होत होते. सततच्या होणाऱ्या या भांडणाला दिपक खूपच वैतागला होता. अशातच बुधवारी दुपारी या दोघांमध्ये पून्हा भांडण झाले. वैतागलेल्या दिपकने भांडणादरम्यान ओढणीच्या साह्याने रूपालीचा गळा आवळून तिला ठार मारले. त्यानंतर त्याने स्वतः शिवाजीनगर पोलीस ठाण्यात अंमलदार एपीआय बागल यांना फोन केला. मी माझ्या पत्नीची राहत्या घरी हत्या केली आहे, पोलिसांना त्वरीत पाठवा, अशी माहिती दिली. यानंतर लगेचच पोलिसांचे पथक घटनास्थळी दाखल झाले. पंचनामा केल्यानंतर रूपालीचा मृतदेह शवविच्छेदनसाठी उल्हासनगरातील मध्यवर्ती रुग्णालयात पाठवण्यात आला असून, पती दीपक याला पोलिसांनी घटनास्थळावरच ताब्यात घेतले आहे. आरोपी दीपक भाई याच्याविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास वरिष्ठ पोलीस निरीक्षक मंजितसिंग बग्गा करत आहेत