महाराष्ट्र

maharashtra

ठाणे जिल्ह्यात पावसाने भिवंडीला सर्वाधिक झोडपले, 24 तासांत 180 मिलिमीटर पावसाची नोंद

By

Published : Jul 19, 2021, 7:23 PM IST

ठाणे जिल्ह्यात रविवार दुपारपासून कोसळणाऱ्या पावसाने भिवंडी तालुक्याला अक्षरशः झोडपून काढले आहे. सकाळपासून तुफान बरसणाऱ्या पावसामुळे भिवंडी शहरातील सखल भाग पुन्हा जलमय झालेला पाहायला मिळाला.

पावसाने भिवंडीला सर्वाधिक झोडपले
पावसाने भिवंडीला सर्वाधिक झोडपले

ठाणे - ठाणे जिल्ह्यात रविवार दुपारपासून कोसळणाऱ्या पावसाने भिवंडी तालुक्याला अक्षरशः झोडपून काढले आहे. सकाळपासून तुफान बरसणाऱ्या पावसामुळे भिवंडी शहरातील सखल भाग पुन्हा जलमय झालेला पाहायला मिळाला. गेल्या 24 तासांत भिवंडी शहर व ग्रामीण परिसरात १८० मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे. तर सर्वात कमी ९७ मिलिमीटर पावसाची नोंद मुरबाड तालुक्यात झाली आहे.

ठाणे जिल्ह्यात पावसाने भिवंडीला सर्वाधिक झोडपले

भिवंडी, कल्याण डोंबिवलीला पावसाचा सर्वाधिक फटका
रविवारी दुपारनंतर सुरू झालेल्या पावसाने मध्यरात्री २ नंतर काहीशी विश्रांती घेतली आणि सकाळी ९ च्या सुमारास पुन्हा एकदा जिल्ह्यात जोरदार पावसाला सुरुवात झाली. त्यामुळे भिवंडी, कल्याण, डोंबिवली, उल्हासनगर, अंबरनाथ शहरात नेहमीच्या सखल परिसरात मोठ्या प्रमाणात पाणी साचलेले पहायला मिळाले. भिवंडी शहर व ग्रामीण भागात पावसाने दमदार हजेरी लावली असल्याने सोमवारी शहरात ठिकठिकाणी सखल भागात पाणी साचले. ठिकठिकाणी साचलेल्या या पाण्यामुळे नागरिकांची मोठी दैना उडाली होती. त्याचबरोबर भिवंडी वाडा रस्त्यावर नदीनाका, अंजुरफाटा ते पूर्णा, अंजुरफाटा ते कल्याणनाका, अंजुरफाटा ते खारबाव रस्त्यावर पाणी साचल्याने सकाळी चाकरमान्यांचे मोठे हाल झाले होते. तर रस्त्यावर साचलेल्या पाण्यातून मार्ग काढताना दुचाकी वाहने व रिक्षा बंद पडल्याने वाहन चालकांना मोठा त्रास सहन करावा लागला. रस्त्यावर गुडघाभर पाणी साचल्याने शहरासह ग्रामीण भागातील रस्त्यांवर मोठी वाहतूक कोंडी झाली होती.

भिवंडीतील कामवारी नदीने ओलांडली धोक्याची पातळी; शेकडो घरात शिरले पुराचे पाणी
रात्रभर कोसळलेल्या पावसाने शहरातील तीनबत्ती भाजी मार्केट, छ. शिवाजी महाराज चौक, धामणकर नाका, कल्याणनाका, म्हाडा कॉलनी, ईदगा रोड, कारीवली दर्गा रोड, कमला हॉटेल, गुलजार हॉटेल, निजामपुरा, राहनाळ, नारपोली, पद्मानगर आणि बसस्थानक परिसरात पाणी साचल्याने नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागला. तर धामणकर नाका कल्याण रोड परिसरात साचलेल्या पाणी व्यापाऱ्यांच्या दुकानात शिरल्याने व्यापारी हैराण झाले होते. तर नदीनाका व ईदगा रोड परिसरातील नागरिकांच्या घरांमध्ये पाणी शिरल्याने नागरिकांना मोठा त्रास झाला असून भिवंडीतील कामवारी नदीने धोक्याची पातळी ओलांडून नदीच्या काठावर असलेल्या शेकडो घरात पुराचे पाणी शिरले आहे. बहुसंख्य घरात पाणी शिरले असताना नागरिकांचे हाल सुरु असून प्रशासनाचे मात्र दुर्लक्ष होत असल्याचे पाहावयास मिळत आहे. तर नदीनाका इथे पुलावरून कामवारी नदीच्या प्रवाहामध्ये मुले उड्या मारून पोहण्याचा आनंद घेत आहे. मात्र नदीला पूर आला असता त्या प्रवाहात मुलांचे पोहणे त्यांच्या जीवावर बेतू शकते.

कल्याण डोंबिवलीत १७७.५ मिलिमीटर पावसाची नोंद
कल्याणच्या छत्रपती शिवाजी महाराज चौक, डॉ. बाबासाहेब आंबेडकर मार्ग, जरीमरी मंदिर, बाजारपेठ आणि पूर्वेतील दुर्गामाता मंदिर रोड परिसर तर डोंबिवली पूर्वेतील स्टेशन परिसर, नेहरू रोड, नांदीवली, एमआयडीसीचा काही भाग आदी परिसर पावसामुळे जलमय झाला. दुपारी 3 नंतरही पावसाचा जोर कायम असल्याचे दिसून येत आहे. त्याशिवाय कल्याण पूर्वेतील शांतीनगर, शिवाजी नगर परिसरात ओम टॉवरच्या जवळील सखल भागात असणाऱ्या घरांमध्येही वालधुनी नदीचे पाणी शिरू लागल्याची माहिती स्थानिक रहिवाशांनी दिली आहे. काही काळ विश्रांती घेऊन मग जोरदार बरसत असणाऱ्या पावसाने सखल भागात राहणाऱ्या नागरिकांची चिंता वाढली असून पावसाचे प्रमाण पाहता पालिका प्रशासनही सावध झाले आहे. गेल्या २४ तासांत कल्याण डोंबिवलीमध्ये १७७.५ मिलिमीटर इतका पाऊस झाला असून हा अतिवृष्टीचा पाऊस आहे. काल दुपारपासून आपली सर्व यंत्रणा सतर्क असून काही ठिकाणी नागरिकांनाही स्थलांतरित करण्यात आले आहे. घरात पाणी शिरण्यापूर्वी नागरिकांनी सुरक्षित स्थळी स्थलांतरित व्हावे. साचलेल्या पाण्याचा निचरा करण्यासाठी आमची सर्व यंत्रणा कार्यरत असून इंटिग्रेटेड कमांड सेंटरमध्ये ७०० कॅमेऱ्यांच्या साहाय्याने शहरातील परिस्थितीवर लक्ष ठेवले जात असल्याचे डॉ. विजय सूर्यवंशी यांनी सांगितले.

गेल्या २४ तासांतील ठाणे जिल्ह्यात झालेला पाऊस
ठाणे - १५१ मिलिमीटर
कल्याण - १७७. ५ मिलिमीटर
मुरबाड - ९७ मिलिमीटर
भिवंडी - १८० मिलिमीटर
शहापूर - १४९.५ मिलिमीटर
उल्हासनगर - १६८ मिलीमीटर
अंबरनाथ - १४६ मिलिमीटर

ठाणे जिल्ह्यात सरासरी १५२ मिलिमीटर पाऊस पडल्याची नोंद जिल्हा प्रशासनाकडून करण्यात आली आहे.

हेही वाचा -'तो' अ‍ॅलिगेटर मासा अज्ञातानेच सोडला पंचगंगेत? वाचा, किती धोकादायक ठरू शकतो

ABOUT THE AUTHOR

...view details