ठाणे- कल्याण-डोंबिवली महापालिका क्षेत्रात २०० आयसीयू बेड्स आणि २०० ऑक्सिजन बेड्स वाढवण्याचा निर्णय शनिवारी पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी घेतलेल्या आढावा बैठकीत घेण्यात आला. त्यासाठी तातडीने जागेची निश्चिती करण्याचे निर्देश पालकमंत्री शिंदे यांनी दिले आहेत. लोकप्रतिनिधींना सोबत घेऊन एक पथक म्हणून काम करण्याचे निर्देशही त्यांनी दिले.
करोनाबाधितांवर उपचार करण्यासाठी मुंबईसह एमएमआर प्रदेशात मोठ्या प्रमाणावर अस्थायी रुग्णालयांची उभारणी करण्यात येत आहे. ठाणे जिल्ह्यात ठाण्यातील बाळकुम येथे एक हजार २४ खाटांचे अद्ययावत वैद्यकीय सुविधा असलेले रुग्णालय आणि नवी मुंबईतील सिडको एग्झिबिशन सेंटर येथे १२०० खाटांचे रुग्णालय सुरू करण्यात आले आहे. या ठिकाणी आयसीयू, डायलिसिस सुविधा, एक्स रे, पॅथॉलॉजी आदी सर्व सुविधा असल्यामुळे ठाणे आणि नवी मुंबईकरांना दिलासा मिळाला आहे. त्यापाठोपाठ अंबरनाथ येथे ७०० बेड्सचे रुग्णालय आणि उल्हासनगर येथे ३०० बेड्सच्या रुग्णालयाचे लोकार्पणही शिंदे यांनी दोनच दिवसांपूर्वी केले. डोंबिवलीत सावळाराम क्रीडा संकुलातही २०० बेड्सच्या अस्थायी रुग्णालयाच्या उभारणीचे काम सुरू आहे.
या पार्श्वभूमीवर पालकमंत्री शिंदे यांनी शनिवारी कल्याण-डोंबिवली महापालिका हद्दीतील करोनाच्या प्रादुर्भावाचा आढावा घेतला. आचार्य अत्रे नाट्यगृह येथील सभागृहात झालेल्या बैठकीत कोविड१९ रुग्णांसाठी बेड्सची संख्या वाढवण्याबरोबरच कॉन्टॅक्ट ट्रेसिंगमध्ये हयगय न करण्याचे निर्देश पालकमंत्री शिंदे यांनी दिले. तसेच, घरोघरी जाऊन मास स्क्रीनिंगवर भर देण्यासही त्यांनी सांगितले.