ठाणे- कंटेनर आणि टेम्पोमध्ये झालेल्या भीषण अपघातात 3 जण ठार तर 2 जण गंभीर जखमी झाले. ही घटना मुंबई-नाशिक महामार्गावरील आटगाव येथे सकाळी घडली. अपघातातील एकाची प्रकृती गंभीर असल्याने मुंबईच्या रुग्णालयात हलवण्यात आले आहे. नवनाथ तुकाराम देवकर, सुजाता भाऊ वाजे, मेनका अशोक वाजे असे अपघातात ठार झालेल्यांची नावे आहेत.
नाशिक - मुंबई महामार्गावर भीषण अपघात
कंटेनरच्या चालकाचे नियंत्रण सुटल्याने कंटेनर थेट महामार्गालगत असलेल्या रेल्वे रुळावर जावून आदळला. सुदैवाने यावेळी रेल्वे मार्गावर एक्क्प्रेस, किंवा लोकल जेत-जात नव्हती. अन्यथा मोठी दुर्घटना घडली असती. या घटनेमुळे शहापूर तालुक्यात एकच हळहळ व्यक्त होत आहे.
नाशिकहुन शहापूरकडे भरधाव वेगाने जाणाऱ्या आयशर टेम्पो ( क्रमांक एमएच 04, डीडी 7335 ) या वाहनावरील चालकाचे आपल्या वाहनावरील नियंत्रण सुटल्याने टेम्पो डीव्हायडर ओलांडून महामार्गावरील मुंबईहुन नाशिकडे जाणाऱ्या रस्त्यावर आला. याचवेळेस मुंबईच्या दिशेकडून नाशिककडे भरधाव वेगात निघालेला एक मालवाहू कंटेनर ( क्रमांक एमएच 46, बीबी 9571 ) या कंटेनरने आयशर टेम्पोला जोरदार धडक दिली. ही धडक इतकी भीषण होती, की कंटेनर टेम्पोला धडक देऊन वेगाने रस्त्यालगतच असलेल्या रेल्वे रुळाजवळ जाऊन कलंडला. मात्र यावेळेस सुदैवाने या रेल्वे रुळावरून एखादी लोकल अथवा एक्स्प्रेस येत नव्हती, अन्यथा येथे मोठा अनर्थ घडला असता.
या भीषण अपघातात नवनाथ तुकाराम देवकर (वय 35 रा. नांदगाव, नाशिक) सुजाता भाऊ वजे (वय 25 रा. रातांधळे) मेनका अशोक वाजे (वय 17 रा. रातांधळे) हे तीन जण जागीच ठार झाले आहेत. तर या अपघातात अर्जुन भैरु भोसले (वय 45 ), व सूरज राजू घाटाळ (वय 16 रा. खोडाळा) हे गंभीर जखमी झाले आहेत. जखमींना तातडीने शहापूर उपजिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.
अपघातातील गंभीर जखमीपैकी एकास उपचारासाठी मुंबई येथील सायन रुग्णालयात उपचारासाठी हलविण्यात आल्याचे शहापूर महामार्ग पोलिसांनी सांगितले. दरम्यान अपघाताची माहिती मिळताच घटनास्थळी शहापूर महामार्ग पोलिसांनी धाव घेत आटगावच्या स्थानिक नागरिकांच्या मदतीने मृतदेह बाहेर काढले. जखमींना तातडीने घटनास्थळावरून रुग्णालयात उपचारासाठी हलविले आहे. या अपघातप्रकरणी शहापूर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.