नवी मुंबई -नेरूळमधील सीवूड्स येथे एका उंच इमारतीला भीषण आग लागली आहे. सेक्टर 36 मध्ये लागलेल्या या आगीत अद्याप कोणतीही जीवितहानी झाल्याचे समोर आले नाही. तसेच आगीचे कारण अस्पष्ट आहे.मात्र, आगीत अग्निशमनदलाचे जवान पाच जवान भाजले आहेत. तसेच दोघांची प्रकृती गंभीर असून त्यांना उपचारासाठी वाशी येथील नवी मुंबई महानगरपालिका हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे. मात्र, भाजलेल्या जखमांची तीव्रता पाहता त्यांना ऐरोली मधील बर्न हॉस्पिटलमध्ये हलवण्यात आल्याची माहिती समोर येत आहे.
नवी मुंबईतील इमारतीत भीषण आग; कारण अस्पष्ट आज सकाळी सातच्या सुमारास सिवूड्स- नेरूळ परिसरातील पाम बीच रोड येथे शिवम अपार्टमेंटच्या 20 व्या व 21 व्या मजल्यावर आग लागली. अचानक आगीने रौद्ररूप धारण केल्याने संपूर्ण इमारतीमधील रहिवासी खाली आले. त्वरित अग्नीशमन दलाला पाचारण करण्यात आल्याने आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश आले आहे.
इमारत उंच असल्याने अग्निशमनदलाला आग विझवण्यासाठी अडचणी येत होत्या. यादरम्यान स्फोट झाल्याने अग्निशमन दलाचे 5 जवान तसेच काही नागरिक भाजले आहेत. अग्निशमनदलाचे दोन जवान गंभीर जखमी असल्याची माहिती मिळत आहे. सध्या आग आटोक्यात आली असून मोठ्या प्रमाणात मालमत्तेचे नुकसान झाले आहे.
केंद्र अधिकारी विकास कोळी, साहाय्यक केंद्र अधिकारी जी.बी. गाडे, अग्निशमन प्रणेता एस.डी. जोशी, डी.एन. जावळे यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
अग्निशमन दलाचे जवान जे.बी. भोये 30 ते 35 टक्के भाजले असून पी.टी. पवार व पी.ए. ठाकरे किरकोळ भाजले आहेत. या जवानांना सर्वप्रथम वाशी येथील नवी मुंबई महानगरपालिकेच्या रुग्णालयात दाखल केले होते. मात्र भाजलेल्या जखमांची तीव्रता पाहता त्यांना ऐरोली मधील बर्न हॉस्पिटलमध्ये हलवण्यात आल्याची माहिती समोर येत आहे.