ठाणे - कोकणात सर्वत्र पावसाने झोडपून काढण्याने अनेक शहरासह ग्रामीण भागात जनजीवन विस्कळीत होऊन अनेक नद्यांनी धोक्याची पातळी ओलांडली. तर मुसळधार पावसामुळे मुंबईची तुंबापुरी झाली. मात्र ठाणे जिल्हात अद्याप तरी पावसाने जोर धरला नाही. त्यामुळे अनेक शहरे व गावांची तहान भागवणारा बारवी डॅममध्ये सध्यातरी केवळ ४१%टक्के इतकाच पाणीसाठा शिल्लक असून गेल्या वर्षात तुलनेत -६ % टक्क्यांनी कमी आहे.
पाण्याअभावी भातलावणी खोळंबल्या
सध्या कोकणात तसेच मुंबई परिसरात मुसळधार पाऊस होत असल्याचे चित्र पहावयास मिळत आहे. कोकणात काही भागाचा विचार केला तर पावसाची सरासरी गेल्या वर्षीच्या तुलनेत कमी आहे. त्यामुळे जिल्ह्यात अनेक भागात पाण्याअभावी भात लावणी खोळंबल्या आहेत.
१३०-१४० दिवस पुरेल इतकाच पाणीसाठा
कल्याण, डोंबिवली, अंबरनाथ, बदलापूर, नवी मुंबई, कर्जत, मुरबाड, उल्हासनगर, टिटवाळा आधी शहर व गावांची तहान भागवणाऱ्या बारवी डॅम परिसरात अजूनही म्हणावा तसा पाऊस पडला नसल्याने डॅममध्ये केवळ ४१% टक्के पाणीसाठा शिल्लक आहे. मागील वर्षी तो ४५ ते ४६% टक्के इतका होता. हा पाणीसाठा १३०-१४० दिवस पुरेल इतका असल्याचे बारवी डॅम अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे. त्यामुळे सध्यातरी या परिसरात पावसाची नितांत गरज आहे.