ठाणे - यापुढे जर तुम्ही वाहतुकीचे नियम पाळत नसाल तर तुमच्या घरातील महिनाभराच्या बजेटला याचा फटका बसणार आहे. मोटार वाहनाच्या नवीन नियमावलीनुसार (New Driving Rules) आता ड्रिंक आणि ड्राइव्हचा दंड (Drink And Drive Fine) दोन हजारवरून १० हजार रुपये करण्यात आला आहे. त्यामुळे तळीरामांनी जरा सावधच राहून गाडी चालवावी, नाहीतर 10 हजार रुपयांना चुना लागणार हे नक्की.
माहिती देताना पोलीस अधिकारी - वाहन चालवताना नियम पाळा -
वाहन चालवण्यासाठी अनेक नियम आहेत. त्यातील महत्वाचा नियम म्हणजे ड्रिंक ऍण्ड ड्राइव्ह हा नियम. कारण मद्यप्राशन करून वाहन चालवण्यामध्ये स्वतःच्या जीवाला तर धोका आहेच, परंतु ज्यांची काहीच चुकी नाही अशा पादचारी लोकांनाहीं यात जीव गमवावा लागत आहे. त्यामुळे वाहतूक पोलिसांनी याबाबत कठोर भूमिका घेतली आहे.
- जलदगतीने नियम लागू होणार -
याच धरतीवर गेल्या लोक अदालतमध्ये २ कोटी १४ लाख रुपयांची वसुली करण्यात आली होती. आता याच नियमाला बळकटी मिळावी म्हणून ड्रिंक ऍण्ड ड्राइव्हचा दंड दोन हजारांवरून आता १० हजार करण्यात आला आहे. यामुळे तळीरामांवर चांगलाच वचक बसणार आहे. त्यामुळे तुमच्या खिशाला मोठी कात्री लागणार आहे. जे वाहतुकीचे नियम पाळतात त्यांना काही काळजी करण्याची गरज नाही. परंतु जे नियम पाळत नाहीत, त्यांची काही खैर नाही. त्यामुळे तळीरामांनी मद्यप्राशन करून वाहन चालवण्याचा प्रयत्न केला तर यासाठी मोठी रक्कम मोजावी लागणार आहे, असे वाहतूक शाखेकडून सांगण्यात आले आहे. हा दंड वसूल करण्याची प्रक्रियाही जलदगतीने करण्यात येणार आहे, असेही वाहतूक पोलीस उपायुक्त बाळासाहेब पाटील यांनी सांगितले.