ठाणे - कोविड प्रतिबंधक अधिनियम मोडून गर्दी करत पोलिसांची परवानगी न घेता बेकायदेशीररित्या डोंबिवलीत जनआक्रोश मोर्चा काढणाऱ्या भाजपा पदाधिकारी व आमदारांसह 27 जणांवर डोंबिवलीच्या रामनगर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला आहे.
पोलिसांच्या नोटीसकडे भाजपा पदाधिकाऱ्यांचा कानाडोळ
डोंबिवलीतील रामनगर पोलिसांनी भाजपा जनआक्रोश मोर्चाच्या आयोजकांना मोर्चा काढू नये, कोणतेही निदर्शन करू नका, शिष्टमंडळाने शांततेत महापालिका अधिकाऱ्यांना भेटावे, कार्यकर्त्यांनी शांत राहून कोरोनाच्या नियमांचे पालन करावे, अशी नोटीस जारी केली होती. तरीदेखील भाजपाच्या शिष्टमंडळाने शेकडो कार्यकर्त्यांसह पोलिसांची कोणतीही परवानगी नसताना मोर्चा काढून महापालिका अधिकाऱ्यांची भेट घेऊन नियमांचे उल्लंघन केले.
विविध कलमांतर्गत गुन्हा
याप्रकरणी पोलिसांनी डोंबिवली भाजपाचे आमदार रवींद्र चव्हाण, जिल्हाध्यक्ष शशिकांत कांबळे, माजी नगरसेवक रणजित जोशी, विशू पेडणेकर, नंदू जोशी, खुशबू चौधरी, आदींसह 27 जणांवर जमाबंदी, कोव्हीड नियम डावलून गर्दी करणे, आणि नोटीस दिलेले असतानाही विनापरवानगी मोर्चा काढणे आदी कलमांन्वये गुन्हा दाखल केला आहे.