ठाणे -तुमच्या घरच्या दारावर मूकबधीर असल्याचे भासवून भीक मागण्यासाठी कोणी येत असेल तर सावधान..! कारण मूकबधीर असल्याचे नाटक करून भीक मागण्याच्या बहाण्याने घरफोडी करणाऱ्या दोघा सराईत चोरट्यांना खडकपाडा पोलिसांनी अटक केली आहे. सत्यराज बोयर आणि बाबू बोयर असे या चोरट्यांची नावे आहेत.
हे दोघे मुके असल्याचे भासवून भीक मागण्यासाठी जायचे. त्यांच्याजवळ एक पिवळ्या रंगाचे 'भारत सरकार कडून मिळालेले सर्टीफिकेट' नावाचा बनावट कागदही असायचा. ज्यामध्ये ही व्यक्ती मुकी असून त्याच्या घरातील सदस्यांना हात-पाय नाहीत, आईने आत्महत्या केल्याचा पत्रात उल्लेख असायचा. भीक मागण्यासाठी जाणाऱ्या ठिकाणी लोकांना हे पत्र वाचण्यात देऊन आर्थिक मदतीसाठी याचना करायचे. एखाद्याने दया दाखवून मदत करण्यासाठी दरवाजा उघडा ठेवला. तर दुसरा साथीदार घरातल्या व्यक्तीची नजर चुकवून घरात प्रवेश करायचा आणि मोबाईल किंवा किमती वस्तू चोरी करून पळ काढायचा. अशी या लोकांची चोरी करण्याची पद्धत होती. या चोरट्यांच्या मूक-बधिरपणाच्या नाटकाला भुलून अनेक जणांनी आपले मोबाईल आणि किमती वस्तू गमावल्या आहेत. खडकपाडा पोलिसांनी या दोघांकडून तब्बल 31 मोबाईल आणि 1 कॅमेरा असा मुद्देमाल हस्तगत केला आहे. या लोकांनी आणखी किती लोकांच्या घरी अशाप्रकारे चोरी केली आहे, याचा तपास खडकपाडा पोलीस करत आहेत.