ठाणे - गेल्या महिन्यात उल्हासनगरमध्ये मोहिनी पॅलेस इमारतीचा स्लॅब कोसळल्याची दुर्घटना घडली होती. या दुर्घटनेत ५ जणांचा बळी घेणाऱ्या बांधकाम विकासकावर उल्हासनगर पोलीस ठाण्यात पालिकेचे सहायक आयुक्त गणेश शिंपी यांच्या तक्रारीवरून महिन्याभरानंतर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मात्र गेल्या आठवडाभरापूर्वीही दुसऱ्या इमारत दुर्घटनेत साईशक्ती याही इमारतीचा स्लॅब कोसळून ७ जणांचा जीव गेला. मात्र त्या बांधकाम विकासकावर गुन्हा कधी? असा प्रश्न उपस्थित झाला आहे.
१० वर्ष जुन्या इमारतींना नोटिसा
उल्हासनगरात सन १९९२ ते ९८ दरम्यान उलावा रेती व दगडाच्या बारीक चुऱ्यातून बहुतांश इमारती बांधण्यात आल्या असून अशा इमारतींचे स्लॅब कोसळून अनेक जणांचा बळी गेला आहे. गेल्या महिन्यात मोहिनी पॅलेस व साईशक्ती इमारतीचे स्लॅब कोसळून १२ जणांचा जीव गेला. या दोन्ही घटनेमुळे शहरात भीतीचे वातावरण निर्माण झाले. महापालिकाने सन १९९४ ते ९८ दरम्यानच्या इमारतीचे सर्वेक्षण करून ५०५ इमारतीचे स्ट्रक्चरल ऑडिट करण्याच्या नोटिसा दिल्या. त्यापूर्वी १० वर्ष जुन्या इमारतींना नोटिसा देणे महापालिकेने सुरू केले. दुर्घटनाग्रस्त झालेल्या मोहिनी व साईशक्ती इमारतीच्या बिल्डरवर गुन्हा दाखल करण्याची मागणी सर्व स्तरातून होऊ लागल्यावर, सहायक आयुक्त गणेश शिंपी यांनी आयुक्तांच्या आदेशानुसार इमारतीचे बिल्डर मनोज लाहोरी यांच्याविरोधात अवैध व विना परवाना इमारत बांधून दुर्घटनेस व नागरिकांच्या मृत्यूस कारणीभूत ठरल्याची तक्रार उल्हासनगर पोलीस ठाण्यात केल्यावर, पोलिसांनी गुन्हा दाखल केला.