ठाणे - भिवंडीतील पटेल कंपाऊंड येथील जिलानी इमारत दुर्घटनेत मालक, भोगवटादार व महापालिकेचे संबंधित अधिकारी दोषी असल्याचे चौकशी समितीच्या अहवालात स्पष्ट झाले आहे. शुक्रवारी सायंकाळी हा अहवाल पालिका आयुक्त डॉ. पंकज आशिया यांना सादर करण्यात आला. ही इमारत बेकायदा बांधण्यात आल्याचेही स्पष्ट झाले आहे. संबंधित इमारत सुस्थितीत ठेवण्याची जबाबदारी मालक, भोगवटाधारकांवर होती. मात्र त्यांनी घेतली नाही. तसेच पालिका अधिकाऱ्यांकडून हलगर्जीपणा झाल्याचे अहवालात नमूद आहे.
सरकारच्या निर्देशानुसार मार्च-एप्रिलमध्ये धोकादायक, अतिधोकादायक इमारतींना नोटीस देऊन त्यांची वर्गवारी 'सी-1' व 'सी-2' असे करणे आवश्यक होते. मात्र तशी शहानिशा पालिका अधिकार्यांनी केली नव्हती. तसेच या इमारतीचे वर्गीकरण देखील तत्कालीन अधिकाऱ्यांनी केले नव्हते. जिलानी इमारत धोकादायक ठरवल्यानंतर ही इमारत निर्मनुष्य करण्यासाठी पोलीस प्रशासनाला कोणतेही पत्र देण्यात आले नाही. त्यामुळे चौकशी समितीने सादर केलेल्या अहवालात इमारत मालकांबरोबरच भोगवटादार आणि महापालिकेचे संबंधित अधिकारीही दोषी असल्याचे स्पष्ट झाले आहे. भविष्यात अशी दुर्घटना घडू नये, यासाठी धोका नियमावली ही चौकशी समितीने प्रशासनाला सादर केली आहे.