ठाणे: कल्याण पश्चिमेला असलेल्या रेल्वेच्या क्वार्टरमध्ये एका मूकबधिर तरुणीवर मोबाईल चोरट्याने बळजबरीने रेल्वेच्यापडीक बंगल्यात बलात्कार केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. या पीडित तरूणीकडील मोबाईल हिसकावून नराधमाने पळ काढला. विशेष म्हणजे या परिसरातील रेल्वे बोगदा आणि आसपासच्या पडीक रेल्वे क्वार्टरची बैठी घरे व बंगल्यांच्या निर्मनुष्य परिसरात वाटमाऱ्यांचे प्रकार घडत असतात. त्यामुळे फरार नराधम लुटारू गर्दुल्ला असण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.
रस्त्यावरून पीडितेला खेचत पडीक बंगल्यात नेले, अन्..
कल्याण पूर्वेत काटेमानिवली परिसरात राहणारी २३ वर्षीय पीडित तरूणी एका खासगी कंपनीत नोकरी करते. कामावर जाण्यासाठी शुक्रवारी सकाळी सव्वापाच वाजण्याच्या सुमारास पीडिता कल्याण पूर्वेकडून रेल्वे मार्ग ओलांडून कल्याण पश्चिमेकडे असलेल्या सुभाष चौकातून पायी जात होती. त्यावेळी रेल्वेच्या पडीक बंगल्यासमोरून जात असताना नराधम लुटारूने रस्त्यावरून या तरूणीला खेचत पडीक बंगल्यात नेले. आणि तिच्याकडील मोबाईल व इतर चीजवस्तू जबरदस्तीने काढून तर घेतल्या आणि तिच्यावर बळजबरीने अत्याचारही करून पलायन केले. या घटनेनंतर पीडित तरूणी भयभीत होऊन घटनस्थळावरून घराकडे पळ काढला.
नराधमाचा शोध घेण्यासाठी पोलीस पथके रवाना ..
पीडितेसोबत घडलेला धक्कादायक प्रकार समजल्यानंतर पीडित तरूणीसह घरच्यांनी महात्मा फुले चौक पोलिस ठाणे गाठून घडलेला सारा प्रकार पोलिसांना सांगितला. पीडित तरुणीच्यावतीने द्विभाषिक तरूणीने दिलेल्या फिर्यादीवरून पोलिसांनी बलात्कारासह लुटीचा गुन्हा दाखल केला. अत्याचारग्रस्त तरूणीची वैद्यकीय चिकित्सा करण्यात आली. या तरुणीने दिलेल्या वर्णनाचा नराधम लुटारू ४८ तास उलटूनही पोलिसांच्या हाती लागलेला नाही. या गुन्ह्याचा तपास फौजदार मंजुषा शेलार यांच्याकडे सोपविण्यात आला आहे. त्याला शोधण्यासाठी स्थानिक पोलिसांची पथके वेगवेगळ्या दिशांना रवाना झाली आहेत.