ठाणे- देशभरात आत्तापर्यंत लाखो नागरिक कोरोनाबाधित झाले असून हजारो भारतीयांना आपले प्राण गमवावे लागले आहेत. परंतु ठाण्यातील वेदांत रुग्णालयात तब्बल 104 वर्षे वयाच्या आजोबांनी कोरोनावर मात करत सर्वांना आशेचा किरण दाखवला आहे. वयाचे शतक पार केलेल्या या आजोबांनी या आजारापुढे अजिबात हार न मानता, त्याला धीराने तोंड दिले. तब्बल 12 दिवसांनी आज ते रुग्णालयातून घरी गेले. आज घरी जाताना वेदांत रुग्णालयातील सर्व डॉक्टर आणि इतर स्टाफने त्यांचे टाळ्या वाजवून कौतुक केले.
104 वर्षीय आजोबांची कोरोनावर मात; रुग्णालयातील सर्वांनी केला कौतुकाचा वर्षाव
ठाण्यातील वेदांत रुग्णालयात तब्बल 104 वर्षे वयाच्या आजोबांनी कोरोनावर मात करत सर्वांना आशेचा किरण दाखवला आहे. वयाचे शतक पार केलेल्या या आजोबांनी या आजारापुढे अजिबात हार न मानता, त्याला धीराने तोंड दिले. तब्बल 12 दिवसांनी आज ते रुग्णालयातून घरी गेले.
काही दिवसापूर्वी ठाण्यात राहणाऱ्या 103 वर्षांच्या आजोबांना देखील अशाच प्रकारे उपचार करुन घरी सोडून देण्यात आले होते. एकीकडे डायबिटीज आणि हृदयविकार असलेल्या लोकांचा जीव कोरोनाच्या आजारामुळे जात असताना स्वतः ला फिट ठेवणाऱ्या या दोन्ही वृद्धांनी समाजापुढे आदर्श ठेवला आहे. आपण स्वतःला शारीरिक आणि मानसिक दृष्ट्या सुदृढ ठेवले तर कोणत्याही आजाराशी दोन हात करता येवू शकतात हे या आजोबांनी दाखवून दिले आहे.
ठाण्यात आतापर्यंत बरे होऊन घरी गेलेल्या नागरिकांची संख्या 4779 एवढी आहे. तर प्रत्यक्षात उपचार घेणाऱ्या रुग्णांची संख्या ही 4034 एवढी आहे. मृत झालेल्या 322 रुग्णांमध्ये पुरुष 213 आहेत, तर महिला 109 असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.