कल्याण (ठाणे) - कल्याण भिवंडी मार्गावरील दुर्गाडी पूल ते रांजनोली नाका या दरम्यान मागील वर्षभरापासून रस्त्याचे काम सुरु आहे. कोट्यवधींचा निधी खर्च करून एमएमआरडीएच्या माध्यमातून या ठिकाणच्या नवीन रस्त्याचे काम सुरू आहे. मात्र, हे काम अत्यंत संथ गतीने सुरू असल्याने ऐन पावसाळ्याच्या तोंडावर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी होत आहे. शनिवारी या ठिकाणी तासाभरात झालेल्या वाहतुक कोंडीत तब्बल दहा रुग्णवाहिका अडकून पडल्या.
ठाण्यात रुग्णवाहिका वाहतुक कोंडीत अडकल्या हेही वाचा...मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी घेतली शरद पवारांची भेट
भिवंडी लोकसभेचे खासदार कपिल पाटील यांनी गेल्या आठवड्यातच या रस्त्याच्या कामावर आक्षेप घेतला होता. हे काम अत्यंत निकृष्ट दर्जाचे साहित्य वापरून सुरू असल्याचे पुरावे त्यांनी एमएमआरडी अधिकाऱ्यांकडे लेखी तक्रारीसह सादर केले.
दरम्यान, कासवछाप गतीने सुरू असलेल्या या कामाबाबत एकीकडे खासदारांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहेत. तर दुसरीकडे मागील दोन दिवसांपासून रस्त्यावर प्रचंड वाहतूक कोंडी होत असल्याचे पहायला मिळत आहे. या वाहतूक कोंडीमुळे दर दिवशी अनेक रुग्णवाहिका अडकून पडतात. विशेष म्हणजे या रुग्णवाहिकांमधून अनेकदा कोरोना बाधित रुग्णांची वाहतुक केली जात असते.