सोलापूर- वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी सोमवारी सोलापूर मधील पूरग्रस्त भागाचा दौरा केला. त्यानंतर पत्रकार परिषद घेऊन त्यांनी राज्य आणि केंद्र सरकारवर टीकास्त्र सोडले. तीन पायाच्या सरकार मधील एक पाय मागे ओढत असल्यानेच शेतकऱ्यांना मदत निधीसाठी विलंब होत असल्याची टीका त्यांनी यावेळी केली.
'तीन पायाच्या सरकार मधील एका पायाच्या दबावामुळे पूरग्रस्तांना मदत मिळेना' - पूरग्रस्तांना मदत
सोलापूर जिल्ह्यात अतिवृष्टीने मोठ्याप्रमाणात नुकसान झाले आहे. त्या पार्श्वभूमीवर वंचितचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी शेतकऱ्यांना मदत देण्याची मागणी केली. तसेच यावेळी त्यांनी महाविकास आघाडी सरकारवर टीका केली. शेतकऱ्यांना मदत करण्यास या ती पायाच्या सरकारमधील एक पाय कारणीभूत असल्याचा आरोप त्यांनी यावेळी केला.
प्रकाश आंबेडकर म्हणाले, की या तीन पायाच्या सरकार मधील एक पाय हे दोन्ही पायांवर दबाव टाकत आहे. त्यामुळे पूरग्रस्तांना मदत निधी मिळण्यास विलंब होत आहे. यामागचे मुख्य कारण म्हणजे यातील एक पाय पुढील महिन्यात साखर कारखान्यांना अनुदान घोषित करण्याच्या तयारीत आहे. त्यासाठी पुरात नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना मदत मिळत नसल्याचा आरोपही त्यांनी केला. तसेच सरकारने केंद्राच्या मदत निधीची वाट न पाहता तात्काळ बळीराजाला मदत घोषित करण्याची मागणीही आंबेडकर यांनी यावेळी केली.
'ज्या पद्धतीने केंद्र सरकारने लॉकडाऊन लागू केला, त्यामुळे अर्थव्यवस्था तर संपलेली आहे आणि आता अतिवृष्टी झालेली आहे, त्यामुळे देखील अनेक गावे उद्ध्वस्त झालेली आहेत. अनेक कुटुंब उघड्यावर आलेली आहेत. सरकारने याकडे दुर्लक्ष करू नये, अशी विनंती आंबेडकर यांनी यावेळी केली. यावेळी प्रकाश आंबेडकर यांनी पंतप्रधान मोदीबाबत आक्षेपार्ह वक्तव्य केले.