सोलापूर - जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागातील वरिष्ठ सहायक कुमार नागपा बसमुंगे आणि कनिष्ठ प्रशासन अधिकारी अलीसाब रजाक शेख या दोघांनाही लाचलुचप प्रतिबंधक विभागाने 40 हजारांची लाच घेताना रंगेहाथ पकडले आहे. सोलापूर जिल्हा परिषद विभागात आरोग्य सेविकेच्या म्हणजेच परिचरिकेच्या नियुक्तीसाठी 1 लाख रुपयांची लाच मागितली होती. शेवटी तडजोडी अंतर्गत 80 हजार रुपये देण्याचे ठरले होते. त्यातील 40 हजार रुपये घेताना त्यांना पकडले आहे. सदर बाजार पोलीस ठाण्यात याबाबत गुन्हा दाखल झाला आहे.
तक्रारदार यांच्या पत्नीची बंधपत्रिका परिचरिका नेमणूकीची फाईल तयार करून वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे पाठवायचे होते. हे कामकाज जिल्हा परिषद आरोग्य विभागातील वरीष्ठ सहायक रजाक शेख व कनिष्ट प्रशासन अधिकारी कुमार बसमुंगे हे पाहत होते. या दोघांनीही 3 जुलै रोजी 1 लाख रुपयांची लाच मागितली होती. त्यानंतर तडजोडी अंतर्गत 80 हजार रुपये देण्याचे ठरले होते. तक्रारदार यांनी सोलापुर लाच लुचपत प्रतिबंधक विभागाकडे याबाबत तक्रार नोंद केली होती. 6 जुलै ते 27 जुलैपर्यंत याची पडताळणी करण्यात आली.