सोलापूर - पंढरपूरच्या दिशेने जात असलेल्या ज्ञानेश्वर माउली पालखी, तुकाराम महाराज पालखी ( Tukaram Maharaj Palkhi ceremony ) सोहळ्यांचे रिंगण ऐतिहासिक अशा बाजीराव विहिरीजवळ शुक्रवारी दुपारच्या सुमारास रंगले.‘भाग गेला, शीण गेला अवघा झालाचि आनंद’ या उक्तीप्रमाणे दोन वर्षाच्या खंडानंतर वारकऱ्यांच्या ( Warakaris ) भक्तिमय उत्साहात रिंगण सोहळा रंगला होता.
ज्ञानेश्वर माउलींचे उभे रिंगण- भंडीशेगाव मधील मुक्काम आटोपून वाखरीकडे निघालेल्या माऊलींच्या पालखीचे दुसरे उभे रिंगण शुक्रवारी दुपारी तीन वाजण्याच्या सुमारास झाले. बाजीराव विहीर परिसरात लाखो वारकऱ्यांनी या सोहळ्यात सहभाग घेतला. माउली पालखीच्या चोपदारांनी रस्त्यावर उभे रिंगण लावले. माऊली आणि पालखी स्वाराचा अश्व उभ्या रिंगणात वेगाने जात असताना हजारो वारकऱ्यांनी अश्वाच्या दिशेने खारका उधळल्या. ज्यांना खारका मिळाल्या त्यांनी प्रसाद म्हणून त्या खारका घेतल्या. भाविकांनी माउली माउली नामाचा जयघोष केला.उभ्या रिंगणानंतर माउलींची पालखी खांद्यावर घेऊन गोल रिंगणासाठी शेजारील मोकळ्या मैदानात नेण्यात आली. येथे पालखी सोहळ्याचे चौथे गोल रिंगण संपन्न झाले. तत्पूर्वी मैदानाजवळ हुतुतू, सूरपाटींचा खेळही रंगला. उद्या शनिवार दिनांक(9 )रोजी वाखरी येथे ज्ञानेश्वर माऊलींच्या पालखीचे शेवटचे मोठे उभे रिंगण होणार आहे.
माउली पालखी मार्गावर चोख नियोजन -संतज्ञानेश्वर पालखी मार्ग हा तुलनेने अरुंद असला तरी सोलापूर ग्रामीण पोलिस दलाने उत्तम नियोजन केले होते. याबाबत ज्ञानेश्वर माउली पालखी सोहळ्याचे प्रमुख राजाभाऊ चोपदार यांनी व्यक्त केले. पंढरीतील वाळवंटातील स्वयंपाक करण्याच्या बंदीबाबत तोडगा निघेल, समन्वयातून मार्ग निघेल, कार्तिकी सोहळ्यापर्यंत हे होईल, अन्यथा न्यायालयीन लढा लढण्यात येईल, असे मतही त्यांनी व्यक्त केले.