सोलापूर- मानवी आरोग्यास आणि पर्यावरणाला धोका पोहोचवणारा तसेच हरित लवादाने बंदी घातलेला मांगुर मासा नष्ट करण्यासाठी राज्य शासनाने मोहीमा आणि वेगवेगळ्या उपाययोजना हाती घेतल्या आहेत. मांगुर माशाचा पूर्ण बंदोबस्त झाला नसताना उपद्रवी व विद्रूप अशा "सकर" या माशामुळे नवीन संकट उजनी धरणावर आले आहे. त्यामुळे महाराष्ट्र शासनाचा मत्स्यव्यवसाय विभाग व सोलापूर जिल्ह्याचा मत्स्य विभाग उजनी धरणात आढळणाऱ्या सकर माशामुळे मासेमारी क्षेत्रात मोठया चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे.
सकर माशामुळे स्थानिक मासे धोक्यात -
मत्स्य व्यवसायिक उजनी धरणातील मांगूर मासा कसा नष्ट करावयाचा या चिंतेत आहेत. आता नवीन संकट सकर या माशामुळे समोर आले आहे. हा मासा मोठ्या प्रमाणात उजनी धरणात सापडू लागल्याने माशांच्या इतर प्रजाती धोक्यात आल्या आहेत. शिवाय मच्छिमारांच्या जाळ्यांचेही अतोनात नुकसान होऊ लागले आहे. उजनी धरणात मच्छिमार करणारे मत्स्य व्यवसायिक सकर माशामुळे हैराण झाले आहेत.
सकर मासा हा मूळ अमेरिकेतला -
सकर माशाची मूळ ओळख फिश टॅंकमधील शोभिवंत मासा म्हणून आहे. फिश टॅंकमध्ये अनेक शोभिवंत माशांनी प्रवेश केल्यानंतर व मासे पाळणाऱ्यांची हौस पूर्ण झाल्यानंतर हा मासा खाडीत नदी सोडून देण्यास सुरुवात झाली. हा मासा मुळचा अमेरिकेतला असल्याचे अभ्यासक सांगत आहेत. आता मुबंई खाडीत व वाराणसीच्या गंगा नदीत हा मासा आढळून आला होता. तेंव्हापासुनच मत्स्य अभ्यासकांनी धोक्याची सूचना दिली होती. मात्र या धोकादायक माशाने आता राज्यातील सर्वात मोठे उजनी पाणलोट क्षेत्र व्यापून टाकले आहे.