पंढरपूर -कोरोना विषाणूच्या पहिल्या व दुसऱ्या लाटेने राज्यामध्ये अक्षरशः धुमाकूळ घातला आहे. दुसऱ्या लाटेने ग्रामीण भागाचे जनजीवन विस्कळीत केले आहे. राज्य सरकार तसेच प्रशासनाकडूनही कोरोनाच्या कडक उपाययोजनावर भर दिला आहे. त्यातच सोलापूर जिल्ह्यातील सर्वाधिक कोरोनाबाधित रुग्णांची संख्या असणाऱ्या पंढरपूर तालुक्याला गेल्या आठवड्यापासून दिलासादायक चित्र निर्माण झाले आहे. तालुक्यातील 11 गावे कोरोनामुक्त करण्यात प्रशासनाला यश आले आहे. तर तब्बल 40 गाव हे कोरोना मुक्तीकडे वाटचाल करत आहेत. कोरोना हॉटस्पॉट ते कोरोना मुक्तीच्या दिशेने वाटचाल करणारा पंढरपूर तालुका म्हणून राज्यात ओळखला जाऊ लागला आहे. तालुका प्रशासनाच्या काटेकोर नियमांच्या अंमलबजावणीमुळे पंढरपूर तालुका कोरोनामुक्तीच्या दिशेने वाटचाल करत आहे.
तालुका प्रशासनाकडून युद्धपातळीवर राबवल्या योजना
पंढरपूर शहर व तालुक्यात तीन महिन्यांपासून कोरोना रुग्ण वाढीचा वेग हा तिपटीने वाढला होता. अनेक गावे निवडणुकीमुळे हॉटस्पॉट ठरली होती. अशा संकटातही तालुक्यातील वैद्यकीय यंत्रणेवर प्रचंड प्रमाणात ताण पडला होता. मात्र त्यातच पंढरपूर शहरापेक्षा ग्रामीण भागात कोरोनाने थैमान घातले होते. जिल्हा प्रशासनाकडून कोरोनाचा प्रादुर्भाव कमी व्हावा, दीड महिन्यापासून संचारबंदी लागू केली आहे. पंढरपूरचे प्रांताधिकारी सचिन ढोले यांनी गेल्या महिन्यापासून पंढरपूर तालुक्याची सूत्रे हाती घेतली व त्यांनी प्रशासनातील अधिकाऱ्यांच्या मदतीने तालुक्यातील विविध ठिकाणचे दौरे करत कोरोनाबाबत लोकांमध्ये जनजागृती केली. त्यानंतर वाढणाऱ्या कोरोनाबाधित रुग्णांची संख्या रोखण्यासाठी प्रशासनाकडून चाचण्यांवर भर देण्यात आला.
पंढरपूर तालुक्याची कोरोनामुक्तीच्या दिशेने वाटचाल
पंढरपूर शहर व तालुक्यात एप्रिल महिन्यात दररोज सुमारे पाचशे नवीन कोरोनाबाधित रुग्ण आढळून येत होते. त्यातच अपुरी असणारी आरोग्य यंत्रणा व वैद्यकीय सुविधांचा अपुरा तुटवडा होता. तालुका प्रशासनाकडून सर्वात प्रथम कोविड केअर सेंटर व कोविड हॉस्पिटलची निर्मिती करण्यात आली. त्यामुळे वाढणाऱ्या कोरोना संख्येला वैद्यकीय उपचार मिळवण्यात मदत झाली. ग्रामीण भागात लोकांच्या सहभागातून गावातच कोविड सेंटरची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली. पोलिसांकडून विनाकारण फिरणाऱ्या नागरिकांवर दंडात्मक व गुन्हे दाखल करण्याची प्रक्रिया सुरू झाली. त्यामुळे घराबाहेर पडणाऱ्या नागरिकांवर लगाम बसली. तालुका प्रशासनाकडून प्रत्येक गावांमध्ये ग्रामसभा आयोजित करून कोरोना जनजागृतीवर भर देण्यात आला. यामुळे वाढणारी कोरोना रुग्ण संख्याही घट झाली. त्यातील काही गावे हे कोरोनामुक्तही झाली आहेत. तर काही गावांच्या रुग्णांची संख्या एकेरी आकड्यावर आहे.