सोलापूर- शहर व जिल्ह्यात कोरोनाचे थैमान सुरूच आहे. रविवारी एकाच दिवशी सोलापूर शहर व ग्रामीण मिळून 316 रुग्ण कोरोनाबाधित आढळले आहेत. रविवारी मध्यरात्री पासून सोलापूरमध्ये लागू करण्यात आलेली दहा दिवसांची संचारबंदी समाप्त झाली. अनलॉकमध्ये आणखी किती रुग्ण वाढतील याचा प्रशासनासमोर मोठा प्रश्न निर्माण झाला आहे.
सोलापूर शहर आणि जिल्ह्यात मिळून कोरोना संसर्गजन्य आजाराच्या 3955 चाचण्या झाल्या. यामध्ये 316 रुग्ण पॉझिटिव्ह मिळून आले आहेत. तर मृत झालेल्या रुग्णांची संख्या 9 आहे. रविवारी जिल्ह्यात 391 जण कोरोना मुक्त झाले आहेत. सोलापूर शहरात रविवारी 2700 अहवाल प्राप्त झाले. यात 2538 जणांचे अहवाल निगेटिव्ह आले आहेत. तर शहरात रविवारी 162 पॉझिटिव्ह रुग्ण आढळले आहेत. यामध्ये 82 पुरुष व 80 स्त्रियांचा समावेश आहे. रविवारी शहरातील 43 रुग्ण कोरोना आजाराने मुक्त झाले आहेत. तर 3 पुरुष मृतांची नोंद आहे. यामध्ये सिव्हिल हॉस्पिटलमध्ये 2 पुरुष व खासगी रुग्णालयात एका पुरुष रुग्णाचा कोरोना आजाराने मृत्यू झाला आहे.