सोलापूर - रेमडेसिविर इंजेक्शनचा मुबलक प्रमाणात साठा उपलब्ध नसल्याने रुग्णांची व त्याच्या नातेवाईकांची दमछाक होत आहे. सर्वसामान्य रुग्णांना हे इंजेक्शन मिळतच नाही. काही रुग्णालये फक्त व्हीआयपी कोट्यातील रुग्णांना रेमडेसिविर इंजेक्शन उपलब्ध करून देत आहेत.
जिल्हा प्रशासनाने काही दिवसांपूर्वी सिव्हिल हॉस्पिटलमध्ये फक्त 18 इंजेक्शन उपलब्ध करून दिले होते. तर रविवारी शरद पवार यांनी 80 इंजेक्शन उपलब्ध करून दिले आहे. उपलब्ध साठाच मुबलक प्रमाणात नसल्याने रुग्णांच्या नातेवाईकांची ससेहोलपट होत आहे. महामारीमुळे सोलापूरकरांचे हाल होत आहेत. वाढती रुग्णसंख्या व वाढता मृत्यूदर यामुळे प्रशासन देखील हादरले आहे. जिल्ह्यात जवळपास सहा हजारांपर्यंत कोरोना रुग्ण आहेत. 350 च्या वर रुग्ण दगावले आहेत.
संपूर्ण राज्यापेक्षा सोलापूरचा मृत्यूदर अधिक आहे. हे इंजेक्शन तयार करणाऱ्या कंपन्या फक्त रुग्णालयांनाच पुरवठा करत आहेत. या औषधांची मुदत देखील फक्त तीन महिने ठेवण्यात आली आहे. काही हॉस्पिटल सर्वसामान्य रुग्णांना हे औषध उपलब्ध नसल्याचे कारण सांगून टाळाटाळ करत आहेत. फक्त व्हीआयपी रुग्णांना रेमडेसिविर उपलब्ध होत असल्याची तक्रार रुग्णांचे नातेवाईक करत आहेत.
रेमडेसिविर इंजेक्शन हे 2014 मध्ये इबोला व्हायरसच्या उपचारावर हे औषध वापरण्यात आले होते. हे औषध इन्ट्राव्हीनस म्हणजेच शरीराच्या नस(शीर)मध्ये देण्यात येतो. रेमडेसिविरचे एक इंजेक्शन 5 हजार ते 6 हजार रुपयांपर्यंत मिळते. एका रुग्णास कमीत कमी 6 ते 12 इंजेक्शनचा डोस द्यावा लागतो. म्हणजेच एका रुग्णास 30 हजार ते 60 हजार रुपयापर्यंत खर्च येत असल्याची माहित डॉ.अमोलकुमार अचलेरकर यांंनी दिली आहे.