सोलापूर- कोरोनामुळे गेल्या दीड वर्षांपासून बंद असलेल्या शाळांची अखेर घंटा वाजली असून शासनाच्या मार्गदर्शक सूचनांचे पालन करीत सोलापूर जिल्ह्यातील कोरोनामुक्त झालेल्या 335 गावातील शाळा सुरू झाल्या आहेत. शाळा सुरू करण्याच्या सूचना पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांनी पत्रकार परिषदेत दिल्या होत्या. त्याअनुषंगाने सोलापूर जिल्ह्यातील ग्रामीण भागात शाळांची घंटा वाजली आहे. दीड वर्षापासून घरी असलेल्या विद्यार्थ्यांमध्ये शाळा सुरू झाल्याचा आनंदच वेगळा होता. जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप स्वामी यांनी स्वतः शाळेत जाऊन विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले आणि विद्यार्थ्यांचे गुलाब पुष्प देत स्वागत केले.
संपूर्ण शाळेचे सॅनेटाईजेशन -
सोलापूर जिल्ह्यातील अनेक शाळा शासनाने कोविडच्या संशयित रुग्णाच्या विलगिकरणासाठी वापरल्या होत्या. त्यामुळे त्या सर्व शाळा सॅनिटाईज करण्यात आल्या. शाळा गेल्या दीड वर्षांपासून बंद असल्याने वर्गांची साफसफाई करण्यात आली. शाळा सुरू झाल्याने ऑनलाइन सुरू असलेल्या वर्गाला काही प्रमाणात थांबा मिळाला आहे.
ज्या गावात कोरोना रुग्ण नाही त्या गावात शालेय वर्ग सुरू -
ऑनलाइन शिक्षणात सर्वच विद्यार्थ्यांकडे मोबाइल होते असे नव्हते. ज्यांच्याकडे होते त्यांना नेटवर्कची अडचण येत होती, तर काही विद्यार्थ्यांना शिकवलेले समजत नव्हते. बरेच विद्यार्थी ऑनलाइन शिक्षणापासून पळ काढत होते. सोलापूर जिल्ह्यातील शाळा सुरू झाल्याने पालकांनी सुटकेचा निश्वास सोडला आहे. असे असले तरी जिल्ह्यातील सर्व शाळा सुरू झाल्या नाहीत. ज्या गावात गेल्या एक महिन्यापासून कोरोनाचे रुग्ण सापडले नाहीत अशा गावातील शाळा सुरू झाल्या आहेत.