सोलापूर -सोलापुरात मृत जनावरांच्या अवयवांपासून बनावट डालडा तयार करणाऱ्या कारखान्यावर ( Raid on Dalda Factory in Solapur ) पोलिसांनी कारवाई केली आहे. दोन संशयीत आरोपींविरोधात जोडभावी पेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. प्रदूषण नियंत्रण मंडळ, पोलीस आयुक्त यांचे भरारी पथक यांनी संयुक्त कारवाई केली. अशी माहिती सहायक पोलीस निरीक्षक जीवन निरगुडे यांनी माहिती दिली.
परिसरात दुर्गंधीमुळे हा प्रकार उघडकीस -
सोलापूर तुळजापूर महामार्गवर असलेल्या कचरा डेपो शेजारी हिप्परगा गावाजवळ येथे काही इसम जनावरांचे मांस, चरबी, हाड, हाडांची भुकटी बनविण्याचा बेकायदेशीर कारखाना सुरू केला होता. याचा उपयोग डालडा बनविण्यासाठी केला जात होता. या कारखान्यामुळे परिसरात दुर्गंधी पसरलेली होती. आजूबाजूच्या नागरिकांना भयंकर त्रास सुरू होता. मानवी जिवीतास धोका निर्माण झाला असल्याच्या तक्रारी संबधित परिसरातील नागरिकांकडून प्राप्त झाल्या होत्या. त्यावर कारवाई करत असताना हा प्रकार उघडकीस आला.
जनावरांचे मास आणि चरबी वितळवण्याचा प्रकार सुरू होता -
सोलापूर पोलीस आयुक्तांच्या भरारी पथकाने शुक्रवारी 17 डिसेंबर रोजी त्या ठिकाणी जाऊन पाहणी केली. त्याठिकाणी शेडच्या कंपाऊडचे आत मोकळ्या जागेत सात लोखंडी कढईमध्ये लाकडांचे मोठे मोठे ओंडके टाकुन जाळ करुन जनावरांचे मांस वितळवित असताना दिसुन आले. वितळविलेल्या मांसची घाण परिसरात सोडल्याने प्रचंड दुर्गंधी येत होती.