सोलापूर - स्थानिक सायबर पोलिसांनी बनावट कागदपात्रांच्या आधारे सिमकार्ड खरेदी करणाऱ्या टोळीला जेरबंद केले आहे. सायबर पोलिसांनी सहा संशयीत आरोपींना ताब्यात घेऊन 75 हजार रुपयांचे मोबाइल आणि विविध कंपनीचे 12 सिम कार्ड जप्त केले आहेत. अवैध व्यवसाय करणारे संशयित या बनावट कागदपात्रांचे सिम कार्ड वापरत होते. या प्रकरणातील आणखी काही आरोपींचा शोध सुरू असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.
स्टोअर्स मालक निघाला मुख्य संशयित
सोलापूर शहरात बनावट कागदपत्रे सादर करून सिम कार्ड विकत मिळत असल्याची तक्रार सायबर पोलिसांना मिळाली होती. त्या अनुषंगाने जोडभावी पेठ पोलीस ठाण्यात गुन्ह्याची नोंद करण्यात आली. पोलिसांनी बलिदान चौक येथील खाऊघर या जनरल स्टोर्सची चौकशी सुरू केली. गोपाल मुदंडा यास ताब्यात घेऊन त्याची विचारपूस सुरू केली. या चौकशीमधून गोपाल याने विविध कंपन्यांचे सिम कार्ड बनावट कागदपत्रांद्वारे विकल्याची माहिती समोर आली. यावेळी एका जनरल स्टोअर्सचा मालकच मुख्य संशयित आरोपी निघाल्याचे समोर आले.