सोलापूर : लॉकडाऊनमुळे हाताला काम नाही आणि खायला काही नाही म्हणून दोघांनी चोरी केल्याची घटना सोलापुरातून समोर आली आहे. पोलिसांनी चोरट्यांना पकडल्यानंतर त्यांनी चोरीची कबुली देताना खायला काही नाही म्हणून चोरी केल्याचे पोलिसांना सांगितले. याविषयी पोलीस अधिक तपास करत आहेत.
लॉकडाऊनमुळे खाण्याचे झाले वांधे, म्हणून निवडला चोरीचा मार्ग! लॉकडाऊनमुळे खायला काही नाही म्हणून केली चोरी
अमोल नागनाथ गायकवाड(वय 28 वर्षे, रा. लिमयेवाडी, सोलापूर) आणि लक्ष्मण अशोक गायकवाड(वय 23 वर्षे, रा. दोन नंबर झोपडपट्टी, विजापूर रोड, सोलापूर) अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत. या दोघांनी शरणकुमार इरणा कणकी(रा. सोनिया नगर,विजापुर रोड,सोलापूर) यांच्या घरी 2 मे 2021 रोजी चोरी केली होती. कणकींनी विजापुर नाका पोलीस ठाण्यात याबाबत तक्रार दाखल करताच डीबी पथकाने या दोन संशयित चोरट्यांना अटक करून 24 तासांच्या आत गुन्हा उघडकीस आणला. या दोघांनी चोरीची कबुली दिली, तसेच चोरीचे कारणही सांगितले. लॉकडाऊन सुरू झाल्यापासून खायला काहीही नाही. घरात अठरा विश्वे दारिद्र्य आहे. हाताला काहीही काम नाही. करायचे काय आणि व्यसन कसे भागवायचे असाही प्रश्न पडला होता, म्हणून चोरी केल्याची कबुली या दोघांनी दिली आहे. पोलिसांनी या दोघांकडून 37 हजार 500 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. सध्या ते पोलीस कोठडीत आहेत.
संसारोपयोगी साहित्याची चोरी
शरणकुमार कणकी यांच्या राहत्या घराला कुलूप पाहून 2 मे रोजी चोरी झाली होती. घरात ठेवलेला मोबाईल, टीव्ही, मिक्सर, तांब्याचा हंडा, कळशी, घागर असा एकूण 37 हजार 500 रुपयांचा मुद्देमाल चोरी गेला होता. विजापूर नाका पोलीस ठाण्यात या घरफोडीबाबत फिर्याद दाखल होताच डीबी पथकाने तपास सुरू केला. 3 मे 2021 रोजी विजापुर नाका पोलीस ठाण्याच्या हद्दीत अमोल गायकवाड हा संशयितरित्या थांबला होता. डीबी पथकाने त्याला हटकले आणि त्याला बोबडी सुटली. अमोल गायकवाडला ताब्यात घेऊन त्याची अधिक चौकशी केली असता त्याने 2 मेला चोरी केल्याची कबुली दिली. त्याचा साथीदार लक्ष्मण गायकवाड याचे देखील नाव सांगितले. अखेर या चोरीचा गुन्हा उघडकीस आला आहे. ही कारवाई वरीष्ठ पोलीस निरीक्षक उदयसिंह पाटील,एपीआय शितलकुमार कोल्हाळ,संजय मोरे,नरोटे,राजकुमार तोळनुरे,श्रीरंग खांडेकर,प्रकाश निकम,बागलकोटे,इम्रान जमादार आदींनी केली.