सोलापूर -कामगार वर्गांचे हित पाहता लॉकडाऊन नको, उपचारावर अधिक भर द्या. स्थानिक प्रशासनाने लॉकडाऊनसारखे निर्णय सोलापूर शहर आणि जिल्ह्यासाठी घेतील तर आम्हाला रस्त्यावर उतरल्याशिवाय पर्याय राहणार नाही. जोपर्यंत लॉकडाऊन असेल तोपर्यंत रस्त्यावर राहू, असा इशारा माजी आमदार व माकपा नेते नसरय्या आडम यांनी दिला आहे. कोरोना महामारीची दुसरी लाट आली आहे. सोलापूरसह राज्यात कोरोनारुग्णांची संख्या वाढू लागली आहे. प्रशासनाने लॉकडाऊनऐवजी उपचारावर अधिक भर द्यावा, असा सल्लादेखील आडम मास्तर यांनी यावेळी बोलताना दिला.
'सर्वात जास्त फटका कामगार वर्गाला'
सोलापूर शहरात विडी कामगार, टेक्सटाइल कामगार, असंघटित कामगार असे अनेक प्रकारचे महिला व पुरुष कामगार मोठ्या संख्येने वास्तव्यास आहेत. गेल्या वर्षी केंद्र सरकारने देशभरात एकाच वेळी लॉकडाऊन लागू केले होते. गेल्या वर्षी लॉकडाऊनचा सर्वात जास्त फटका कामगार वर्गाला बसला आहे. जवळपास सोलापूर शहरातील दोन लाख कामगारांना याची झळ बसली आहे. विडी कामगार, टेक्सटाइल कामगार यावर अत्यंत हलाखीचे जीवन जगण्याची वेळ आली होती. गेल्या वर्षी झालेल्या लॉकडाऊनमधून कामगार कसेबसे बाहेर पडत आहेत. वाढती रुग्ण संख्या पाहून आणखी लॉकडाऊनसारखे निर्णय झाल्यास याचा तीव्र स्वरूपात विरोध केला जाणार असल्याची माहिती त्यांनी दिली आहे.