सोलापूर-मुस्लिम समाजाचा कैवार घेऊन आलेल्या एमआयएम नेते आणि नगरसेवक राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करत असल्याची चर्चा सोलापुरात जोराने सुरू आहे. सोलापुरात 2014 सालच्या विधानसभा निवडणुकीत एमआयएम पक्ष मोठ्या ताकदीने उभा होता. त्यानंतर फेब्रुवारी 2017 मध्ये झालेल्या सोलापूर महानगरपालिकेच्या निवडणुकीत एमआयएमच्या 9 नगरसेवकांनी विजय मिळाला होता. पण शहराध्यक्ष पदावरून पक्षात दोन गट निर्माण झाले. तौफिक समर्थक आणि शाब्दी समर्थक या दोन गटांत शहराध्यक्ष पदावरून शाब्दिक चकमक देखील झाली. अखेर, सोलापूर येथील एमआयएम पक्षात गळती सुरू झाली. राजकीय वर्चस्वाच्या लढाईत एमआयएम पक्षाचे कार्यकर्ते मात्र संभ्रमात आहेत. ज्या ताकदीने एमआयएम पक्षाने सोलापुरात आपले प्रस्थ निर्माण केले होते. तो पक्ष आता सोलापुरात टिकेल का नाही असा संशय मुस्लिम समाजातील तरुण कार्यकर्ते व्यक्त करू लागले आहेत. कारण आजी माजी शहराध्यक्षांच्या वर्चस्वाच्या लढाईत एमआयएम पक्ष सोलापुरात भरकटलेल्या अवस्थेत दिसत आहे.
माजी शहराध्यक्ष तौफिक यांच्या समर्थकांनी पक्षाला ठोकला रामराम -
फेब्रुवारी 2017 मध्ये एमआयएम पक्षाचे नऊ नगरसेवक सोलापूर महानगरपालिकेत निवडून गेले. पालिकेच्या नियमानुसार एक नगरसेवक स्वीकृत घेण्याचा अधिकार एमआयएम पक्षाला प्राप्त झाला होता. त्यावेळी तौफिक शेख यांच्या कट्टर समर्थकांना अपेक्षा होती की, आपल्यामधूनच एक स्वीकृत नगरसेवक होईल. परंतु, या कट्टर समर्थकांचा अपेक्षाभंग झाला, अखेर गाजी जहागीरदार यांची स्वीकृत नगरसेवकपदी वर्णी लागली. यामुळे तौफिक शेख यांच्या कट्टर समर्थकांमध्ये नाराजी पसरली होती. यामध्ये कोमारु सय्यद, इम्तियाज अल्लोळी, असिफ तिमापुरे, जावेद सय्यद, दौला कुमठे आदींना गाजर दाखवण्यात आले. यांनी लगेच तौफिक शेख यांची साथ सोडत आपल्या वैयक्तिक व्यवसायात लक्ष दिले आणि काँग्रेसच्या गोटात गेले. एमआयएम पक्षाची उभारणी करतानाच्या कार्यकर्त्यांना तर नगरसेवक निवडणुकीचे तिकीटसुद्धा दिले नव्हते. यामध्ये याकूब शेख, शकील शेख यांना वेळोवेळी ठेंगा दाखवण्यात आला होता.
फारूक शाब्दीच्या आगमनानंतर तौफिक समर्थकांत नाराजी -
2014 साली झालेल्या सोलापूर शहर मध्य विधानसभा निवडणुकीत तौफिक शेख यांनी एमआयएम पक्षाकडून विधानसभा निवडणूक लढवली होती. विद्यमान आमदार प्रणिती शिंदे यांना टक्कर देत दुसऱ्या क्रमांकावर मते प्राप्त केली होती. यानंतर 2019 मधील विधानसभा निवडणुकीत फारूक शाब्दी यांना पक्षाकडून विधानसभा निवडणुकीचे तिकीट प्राप्त झाले होते. त्यावेळी तौफिक शेख एका खून प्रकरणात विजयपूर (कर्नाटक) येथील कारागृहात संशयीत आरोपी म्हणून बंद होते. 2019 साली झालेल्या विधानसभा निवडणुकीत फारूक शाब्दी यांना देखील दुसऱ्या क्रमांकावर मते प्राप्त झाली. पण फारूक शाब्दी यांच्या आगमनानंतर सोलापूर येथील एमआयएम पक्षात कुजबुज सुरू झाली होती. यावर वेळोवेळी पडदा टाकण्यात आला होता. ऐनवेळी पक्षाने उमेदवार बाहेरून आयात करून विधानसभा निवडणुकीच्या रिंगणात उभे केले होते. शहर मध्य विधानसभा क्षेत्र मुस्लिम बहुल असल्याने स्थानिक नेत्याला संधी मिळेल अशी अपेक्षा होती. परंतु, तसे न होता फारूक शाब्दी यांना मुंबईहुन आयात करण्यात आले.