सोलापूर- वर्धा जिल्ह्यात ज्याप्रमाणे स्त्रीभ्रूण हत्याकांड झाले. तसे इतर कोणत्याही जिल्ह्यात होऊ देणार नाही, असे आरोग्य मंत्री राजेश टोपे ( Minister Rajesh Tope ) म्हणाले. सोलापुरात पीसीपीएनडीटी ( PCPNDT ) कायद्याची पायमल्ली होत असेल तर कडक कारवाई करू, असा इशाराही टोपे ( Health Minister on PCPNDT ) यांनी दिला, ते सोलापूर जिल्ह्याच्या दौऱ्यावर असून शनिवारी ते सोलापूर शहरात मुक्कामी होते. आज (दि. 30 जानेवारी) त्यांनी माध्यमांशी संवाद साधला
सिव्हील हॉस्पिटलमध्ये रुग्ण आणि नातेवाईकांना त्रास होणार नाही -सोलापूर येथील छत्रपती शिवाजी महाराज सर्वोपचार रुग्णालय म्हणजेच सिव्हिल रुग्णालयात ( Civil Hospital ) वेगवेगळ्या प्रकारची नियमावली लागू करण्यात आली आहे. या नियमावलीनुसार कोणत्याही वाहनास ओपीडीपर्यंत सोडले जात नाही. तसेच तीन प्रवेशद्वारांपैकी एक प्रवेशद्वार बंद करण्यात आले आहे. याचा फटका थेट रुग्णांना बसत आहे. उपचारासाठी दाखल होताना अनेक समस्यांना तोंड द्यावे लागत आहे. याचा विरोध अनेक सामाजिक संघटनानी करत आरोग्यमंत्री राजेश टोपे यांना निवेदन दिले. यावर मंत्री टोपे म्हणाले, सिव्हिल रुग्णालयात रुग्ण आणि त्यांच्या नातेवाईकांना कोणत्याही प्रकारचा त्रास होऊ देणार नाही. त्याबाबत काळजीपूर्वक विचार करू. जिल्हा शल्य चिकित्सक आणि अधिष्ठाता यांना त्याबाबत सक्त सूचना देऊ, असेही टोपे म्हणाले.