सोलापूर - हरतालिका हे हिंदू धर्मातील महिलांसाठी आणि कुमारिकांसाठी सांगितलेले एक धार्मिक व्रत आहे. चांगला पती मिळावा यासाठी कुमारिका हरितालिका हा व्रत करतात. तर ,जन्मोजन्मी आपल्याला तोच पती मिळावा म्हणून महिला हरतालिका व्रत करतात.पार्वतीला शिव प्राप्तीसाठी सखी तपचर्येला घेऊन गेली. म्हणून पार्वतीला हरितालिका असे म्हणतात. हरतालिका ही कथा भविष्य पुराणातील हरगौरीसंवादात आली आहे.
हरतालिका व्रताचा इतिहास
पूर्वकाली पर्वतराजाची कन्या पार्वती ही उपवर झाली होती. नारदाच्या सल्ल्याने तिच्या पित्याने तिचा विवाह विष्णूशी करण्याचा बेत केला होता. परंतु पार्वतीच्या मनात शंकराला वरण्याचे असल्याने तिने सखी मार्फत पित्यास निरोप पाठविला. तुम्ही मला विष्णूच्या पदरी बांधल्यास मी प्राणत्याग करेन. आपल्या सखीच्या मदतीने घरातून पळून गेली. शिव प्राप्त व्हावे म्हणून एका अरण्यात जाऊन शिवलिंगाची पूजा आरंभली. त्या दिवशी भाद्रपद मासातील तृतीय व हस्त नक्षत्र होते. पार्वतीने शिवलिंगाची पूजा केली आणि दिवसभर कडकडीत उपवास करून जागरण केले. पार्वतीच्या तपाने शिव प्रसन्न होऊन तिचा पत्नी म्हणून स्वीकार केला.
महिला आणि कुमारिका करतात व्रत
जन्मोजन्मी तोच पती मिळावा म्हणून भारतातील महिला हरतालिका व्रत करतात. तर कुमारिका या आपल्याला चांगला किंवा योग्य पती मिळावा म्हणून हरतालिका व्रत करतात. हरतालिका व्रत हे खास महिलांसाठी किंवा कुमारिकांसाठी आहे.भाद्रपद महिन्याच्या शुक्ल पक्षाच्या तृतीयेच्या दिवशी हरतालिका व्रत साजरा केला जातो.